राष्ट्रवादी काँग्रेसमधील ( अजितदादा पवार ) माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवारसाहेब यांची भेट घेतली आहे. काही दिवसांमधील ही दुसरी भेट आहे.
यापूर्वी आमदार बबनदादा शिंदे यांनी सुपुत्र आणि सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्यासोबत पवारसाहेबांची भेट घेतली होती. या भेटींमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या गव्हर्निंग कौन्सिलची पुण्यातील मांजरी येथे बैठक होत आहे. या बैठकीसाठी शरद पवारसाहेब ( Sharad Pawar ) उपस्थित आहेत. माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे हे सुद्धा बैठकीसाठी आले आहेत. यावेळी आमदार शिंदे यांनी शरद पवारसाहेबांची भेट घेतली. भेटीत आमदार शिंदे आणि पवारसाहेबांमध्ये कोणती चर्चा झाली, याचा तपशील मिळू शकला नाही.
आमदार शिंदे यांनी 4 ऑगस्टला पुण्यातील मोदी बागेत पवारसाहेबांची भेट घेतली होती. माढ्यातून आमदार शिंदे ( Babandada Shinde ) यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे हे विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याची चर्चा वर्षभरापासून सुरू आहे. मात्र, लोकसभेला राष्ट्रवादीचे ( शरदचंद्र पवार ) धैर्यशील मोहिते-पाटील यांना माढ्यातून मोठं मताधिक्य मिळालं होतं.
आमदार शिंदे यांच्याऐवजी रणजितसिंह शिंदे हे विधानसभा निवडणूक लढले, तर त्यांच्यापुढे 'तुतारी'चे मोठे आव्हान आहे. त्यामुळे मुलाची राजकीय 'इनिंग' विना अडथळा सुरू व्हावी, यासाठी आमदार शिंदे, सातत्यानं पवारसाहेबांना भेटत नाहीत ना? असा सवाल उपस्थित होत आहे.
दुसरीकडे बबनदादा शिंदे यांचे लहान बंधू रमेश शिंदे यांनीही काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. तर, रमेश शिंदे यांचे सुपुत्र धनराज शिंदे यांनीही 13 ऑगस्टला पवारसाहेबांची भेट घेतली होती. धनराज शिंदे हे माढा विधानसभा मतदारसंघातून 'तुतारी'कडून लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत रणजितसिंह विरुद्ध धनराज शिंदे या चुलत बंधूंमध्ये संघर्ष पाहायला मिळणार का? हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.