Solapur Congress Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Congress : 'काँग्रेस भवनात दिसाल तर कार्यकर्ते नागडं करून मारतील’; सोलापूर शहर उपाध्यक्षांचा कार्याध्यक्षांच्या कार्यकर्त्यांना इशारा

Local Body Election 2025 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष नेमण्याच्या हालचाली ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सुरू केल्या आहेत. मात्र, त्यावरूनच पक्षात वाद पेटला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 26 July : लोकसभा निवडणुकीनंतर ओहोटी लागलेल्या काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद काही केल्या मिटायला तयार नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष नेमण्याच्या हालचाली ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सुरू केल्या आहेत. मात्र, त्यावरूनच पक्षात पुन्हा वाद पेटला आहे. सोलापूर शहराचे उपाध्यक्ष सुनील रसाळ यांनी ‘जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्या कार्यकर्त्यांना उद्देशून ‘तुम्ही उद्या काँग्रेस भवनात दिसला, तर पक्षाचे कार्यकर्ते तुम्हाला नागडं करून मारल्याशिवाय राहणार नाहीत,’ असा इशारा दिला आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या (Congress) उत्तर सोलापूर तालुकाध्यक्षपदी भरत जाधव यांची नियुक्ती खासदार प्रणिती शिंदे यांनी जाहीर केली हेाती. त्यानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जाधव यांचा सत्कारही केला. मात्र, शुक्रवारी सायंकाळी तालुक्यातील दुसऱ्या गटाने आम्हीच मूळचे काँग्रेसचे असून सुदर्शन अवताडे यांना तालुकाध्यक्ष करावे, अशी मागणी केली, त्यामुळे काँग्रेस पक्षात पदावरून बेदिली कायम आहे.

महापालिका, नगरपरिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणुकीच्या तोंडावर सर्व राजकीय पक्षांकडून संघटना बांधणीवर जोर दिला जात आहे. काँग्रेस वगळता भाजप, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी यांनी जिल्हाध्यक्ष नेमून संघटना मजबुतीला प्राधान्य दिले आहे. काँग्रेसला मात्र आजूनही आपला जिल्हाध्यक्ष नेमता आलेला नाही. त्याचदृष्टीने सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) आणि प्रणिती शिंदे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

जिल्हाध्यक्ष नेमण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चाचपणी केली. त्यामध्ये काही लोकांनी प्रणिती शिंंदे यांच्या विचाराला विरोध केला. त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत जनवात्सल्यावर एक बैठक झाली आणि त्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्या कार्यालयात तो वाद मिटला होता, असे सुनील रसाळ यांनी सांगितले.

ते म्हणाले, नंदकुमार पवार यांनी जनवात्सल्यावरील बैठकीनंतर काँग्रेस भवानात समर्थकांच्या उपस्थितीत एक बैठक घेतली. त्या बैठकीला पवार, सातलिंग शटगार व इतर उपस्थित होते. त्या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांना जिल्हाध्यक्ष नेमण्याबाबत काय अधिकार आहेत, अशा वल्गना काही कार्यकर्त्यांनी केली.

प्रणिती शिंदे ह्या प्रदेश कार्याध्यक्षा, वर्किंग कमिटीच्या सदस्य आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदासाठी कोणाचे नाव द्यायचे, याचे अधिकार प्रणिती शिंदे यांना आहेत. पण ज्यांची राजकीय उंची त्यांच्या बुटाएवढी आहे, अशा लोकांना बोलावून नंदकुमार पवार आणि शटगार यांनी बोलावून घेऊन कृत्य केले, ते निषेधार्थ आहे, असे रसाळ यांनी सांगितले.

नंदकुमार पवार यांच्या तीनपाट कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही आज जे काही बोललात, आम्ही काँग्रेस कार्यकर्त्यांना थांबवलेले आहे. सोलापूर शहातील काँग्रेस भवनात उद्या तुम्ही दिसला तर काँग्रेस कार्यकर्ते तुम्हाला नागडं करून मारल्याशिवाय राहणार नाहीत. त्याची जबाबदारी काँग्रेस कार्यकर्त्यांवर राहणार नाही. माझी नेत्यांना विनंती आहे की, नंदकुमार पवार आणि सातलिंग शटगार यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी रसाळ यांनी केली आहे.

‘उत्तर’च्या निवडीवरूनही वाद

उत्तर सोलापूर काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदासाठी भरत जाधव यांच्या व्यतिरिक्त काँग्रेस भटक्या जमाती आघाडीचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, सुदर्शन अवताडे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांना भेटून अवताडे यांना तालुकाध्यक्ष करण्यात यावे, अशी मागणी भोसले यांनी केली आहे. त्यामुळे जाधव यांच्या नियुक्तीला भोसले, अवताडे यांचा विरोध असल्याचे स्पष्ट आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT