
Solapur, 26 July : विधान परिषद सदस्य रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षविरोधी कारवायाबाबत भाजपकडून कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यानंतर मात्र मोहिते पाटील पक्षाच्या सर्व बैठकांना, कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत. याबाबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ‘भाजप हा व्यक्तीपूजक नाही. कोणा एका व्यक्तीच्या भरोशावर हा पक्ष चालत नाही. विधानसभेला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात किती चांगले चांगले लोक घरी गेले आहेत,’ असे सूचक विधान केले आहे.
गिरीश महाजन हे पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी मोहिते पाटलांना (Mohite Patil) डावलल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपचा तोटाच झाला आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर महाजन म्हणाले, फायदा-तोटा कोणाचाच नाही. एकनाथ खडसेंनाही वाटायचं मला सोडून काहीच नाही. कुठं काय...काहीच नाही. भारतीय जनता पक्ष व्यक्तीपूजक नाही. कोणा एका व्यक्तीच्या भरोशावर हा पक्ष चालत नाही. विधानसभेला तुम्ही पाहिलं असेल की, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र असेल...किती चांगले चांगले लोक घरी गेले आहेत.
भाजप हा पक्ष आणि विचार आहे. कुठली व्यक्ती काय म्हणते, इकडे जाते, तिकडे जाते यावर हा पक्ष हलत-डुलत नाही. माणसं संपून जातात. मी इथलचं नाही तर संपूर्ण देशभरातलं सांगतो. अनेक राज्याचे मुख्ममंत्री आले आणि गेले. ‘आमच्यामुळे,’ असे मानणारे आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आज त्यांचं नावही कोणी घेत नाही, असेही गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमाला नेहमीच असतात. पक्षाच्या बैठकींना, मुख्यमंत्र्यांकडेही असतात, कारण ते अजून आमच्या पक्षाचे सदस्य आणि आमच्या पक्षाकडून झालेले आमदार आहेत, त्यामुळे ते कार्यक्रमाला येत असतात, असेही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
सगळ्याच पक्षाचे लोक आमच्याकडे येत आहेत. काँग्रेस पक्षापेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकच आमच्याकडे येताना थोड्या दिवसांत दिसतील. सध्या तांत्रिक अडचणी आहेत, एक-दोन आमदार आणि चार खासदारांना तसं येता येत नाही. तांत्रिक अडचणी आडव्या येत आहेत. पण, अनेक लोकं आमच्याच मार्गावर आहेत. ते तिथं राहायला उत्सुक नाहीत, असा गौप्यस्फोटही महाजन यांनी केला.
ते म्हणाले, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई होणार की नाही, याबाबत सांगण्याचा मला अधिकार नाही. त्यासंदर्भात पक्षश्रेष्ठीच ठरवतील. याबाबत मुख्यमंत्र्यांशीही माझी चर्चा झालेली नाही. त्यावर बोलण्याबाबत मी अधिकृत नाही.
सुधीरभाऊ आणि मी सात टर्म एकत्र आहोत. त्यांना मंत्रिपदावर संधी मिळाली तर चांगलंच आहे. हनीट्रॅप हा विषयच नाही. राज्यात सध्या भरपूर विषय आहेत. जिल्ह्यातील, मतदारसंघातील प्रश्नावर बोललं पाहिजे. हनीट्रॅप हा विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.