राजेंद्र त्रिमुखे
Ahmednagar Politics : राज्यात गेला आठ-दहा दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसअंतर्गत पक्षकलहाने अवघ्या राज्याचे लक्ष केंद्रित केले आहे. अशात राज्यातील लांबत चाललेला पाऊस, खोळंबलेल्या पेरण्या आणि पाणी टंचाई मुळे ग्रामीण महाराष्ट्रात पिण्याचे जनावरांच्या पाण्या-चाऱ्याचा प्रश्न याकडे कुठेतरी या सत्तासंघर्षात दुर्लक्ष होत आहे का, असा प्रश्न सामान्य नागरिकांत आहे.
कर्जत-जामखेडचे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ.रोहित पवारांनीही हाच प्रश्न आता सरकारला विचारला असून पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी आता स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून जनतेला पिण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा सुरू करावा लागत असून, राजकीय फोडाफोडी झाली असेल तर आता राज्यातील हे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याकडं शासन म्हणून सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे असा खोचक सल्ला दिला आहे.
नेहमीच कमी पर्जन्यमान असल्याने कर्जत-जामखेड तालुके दुष्काळाच्या छायेत असतात. दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा, जनावरांसाठी चारा छावण्याचे नियोजन शासकीय तसेच खाजगी पातळीवर करण्याची अनेकदा वेळ येते. अशात आ.रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघात काही गावांत पाणी टंचाई जाणवू लागल्याने स्वतःच्या माध्यमातून पाण्याचे टँकर सुरू केले आहेत.
याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज सरकारी यंत्रणांनी वर्तवला आहे आणि त्याअनुषंगानेच जुलै महिना अर्धा संपत आला तरी राज्याच्या बहुतांश भागात पुरेसा पाऊस पडलेला नाही. माझ्याच मतदारसंघात अनेक गावांमध्ये मी टँकरने पाणी पुरवठा सुरु केलाय. अशी माहिती आ.रोहित पवार यांनी सोशल माध्यमातून दिली आहे.
राज्यात अनेक गावांमध्येही स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतींकडून तर कुठं व्यक्तीगत पातळीवर टँकर सुरु केले जात आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आहे. त्यामुळं राजकीय फोडाफोडी झाली असेल तर आता राज्यातील हे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याकडं सरकारने लक्ष देण्याची गरज आहे!, असे म्हणत आ.रोहित पवार यांनी सरकारला चपराक लावली आहे. तसेच मतदारसंघात पाण्याचे टँकर वैयक्तिक पातळीवर सुरू करत आपले राजकीय विरोधक आ.राम शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्नही यातून दिसून येत आहे.
जिल्ह्यात आज (जुलै महिना) मितीला जिल्हा परिषदे मार्फय सुरू असलेल्या 47 टँकर सुरू करण्यात आले असून पाऊस असाच लांबला तर ही संख्या वाढणार आहे. सर्वात जास्त 17 टँकर पारनेर तालुक्यात सुरू आहेत. त्यानंतर 10 टँकर संगमनेर तालुक्यात, 10 टँकर पाथर्डी तालुक्यात, 9 टँकर नगर तालुक्यात, तर 1 टँकर अकोले तालुक्यात सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या 54 गावे व 271 वाडीवस्त्यांवरील 99 हजार 7 ग्रामस्थांची तहान टँकरच्या पाण्याने भागवण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाली आहे.
रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मधील उभ्या फुटी नंतर आक्रमक भूमिका घेत आता शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्या महायुती सरकारवर हल्लाबोल सुरू केल्याचे दिसून येत आहे. राज्यातील फॉक्सकोन समूहाने वेदांता सोबतच्या भागीदारीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर पण आ.पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
सेमीकंडक्टरचा हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता. परंतु केवळ गुजरातच्या निवडणुकांसाठी केंद्र सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेला. तेव्हाच वस्तुस्थितीचे भान ठेवून केंद्र सरकारने निर्णय घेतला असता तर कदाचित आज फॉक्सकोनने माघार घेतली नसती. यास जेवढे केंद्र सरकार जबाबदार आहे त्यापेक्षा अधिक जबाबदार महाराष्ट्र सरकार देखील आहे. असा आरोप करत, महाराष्ट्रासारख्या राज्यात गुंतवणुकीच्या संधीस फॉक्सकोन कदापि नकार देऊ शकणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने प्रयत्न करण्यास हरकत नाही.
अजूनही वेळ गेलेली नाही, फोडाफोडीचे राजकारण सोडून आता तरी युवकांच्या उज्वल भविष्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करायला हवेत. युवकांच्या भविष्याची काळजी नसेल तर किमान येणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन तरी प्रयत्न करा., असा खोचक सल्ला आणि टीका आ.रोहित पवार यांनी यानिमित्ताने केली आहे.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.