प्रमिला चोरगी
Solapur, 01 February : सोलापूर महानगरपालिका माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित ‘लोकमंगल’वर मेहेरबान असल्याची दिसून येत आहे. कारण आठ वर्षांपूर्वी ज्या जागेवरील आरक्षणे हटवून त्याबदल्यात एक लाख स्क्वेअर फूट जागा मूळमालकांकडून घेतली होती. आता नव्या विकास आराखड्यात ‘लोकमंंगल’ची जागा वगळून इतर सर्व खासगी जागा मालकांच्या जागांवर पुन्हा नव्याने आरक्षणे टाकली आहेत, त्यामुळे महापालिकेच्या साक्षेपी कारभाराबद्दल संताप व्यक्त होत आहे.
सोलापूर (Solapur) महापालिकेने शहराच्या विकास आराखड्याचे सुधारित प्रारूप जाहीर केले आहे, त्यात अनेक विस्मयकारक गोष्टी पुढे आल्या आहेत. त्यातील एक म्हणजे आरक्षण उठवलेल्या जागेवर राजकीय नेत्यांशी संबंधित जमिनी वगळून उर्वरीत जमिनींवर नव्याने आरक्षण टाकणे. याशिवाय सातारा जिल्ह्यातील अनेक गोष्टी सोलापूरच्या आराखड्यात दाखवण्यात आलेल्या आहेत.
जुळे सोलापुरात अंबर हॉटेलसमोरील तब्बल १३ एकराच्या भूखंडावर महापालिकेकडून (corporation) उद्यान, सांस्कृतिक भवन, फायर ब्रिगेड, बस टर्मिनल आदींसाठी आरक्षणे टाकली होती. मात्र, जुळे सोलापूरच्या मध्यवर्ती भागात ही जागा असल्याने त्या भूखंडावर अनेक राजकीय नेत्यांचा डोळा होता. राजकीय नेत्यांनी आपले कसब पणाला लावून मूळ जमीनमालकांना संबंधित जागेवरील आरक्षण उठविण्यासाठी प्रवृत्त केले. त्यानंतर २०१६ मध्ये या १३ एकरांवरील आरक्षण उठविण्यात आले.
महापालिकेने पूर्वीची आरक्षण उठविताना जागा मालकांकडून एकूण जागेच्या २५ टक्के जागा ही विनामोबदला देण्याची अट घातली होती. त्यानुसार एक लाख स्क्वेअर फूट जागा महापालिकेला दिली होती. त्या जागेवर महापालिकेने अद्याप काहीही उभारलेले नाही, हे मात्र विशेष.
दुसरीकडे, महापालिकेने जागांवरील आरक्षण उठविल्यानंतर काही राजकीय नेत्यांनीही संबंधित जागा मालकांकडून जागा खरेदी केली होती. यामध्ये माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगल, सुभाष जाधव, संजय शेळके, आप्पासाहेब पाटील यांचा समावेश आहे.
सोलापूर महापालिकेने आता शहराचा सुधारित विकास आराखड्याचे प्रारूप जाहीर केले आहे. त्यात याच जागेवर महापालिकेने पुन्हा आरक्षण टाकले आहे. मात्र, आरक्षण टाकताना माजी मंत्री देशमुख यांच्याशी संबंधित असलेली ‘लोकमंगल’ची जागा वगळण्याची मोठी किमया पालिका प्रशासनाने साधली आहे. लोकमंगलची जागा वगळून उर्वरीत जागांवर सिटी बस टर्मिनल, फायर ब्रिगेड, एक्झिबेशन सेंटरचे आरक्षण टाकले आहे. याशिवाय विजापूर रोडवरील रद्द केलेले एसटी बसस्थानक, सांस्कृतिक भवनाचेही आरक्षण टाकले आहे.
आरक्षणाबाबत मला माहिती नाही : सुभाष देशमुख
जुळे सोलापूर भागातील नागरिकांच्या भावना तीव्र आहेत. महापालिका प्रशासनाने त्या लक्षात घेतल्या पाहिजे. विकास आराखड्यावरील हरकती आणि सूचनांचा विचार प्रशासनाने केला पाहिजे. त्यासंबंधी आपणही पत्र देणार आहे. पण, अंबर हॉटेलसमोरील जागेवर टाकण्यात आलेल्या आरक्षणाबाबत आपणास काही माहिती नाही. आराखडा बघितल्याशिवाय आपण त्यावर काही बालणे योग्य ठरणार नाही, असे माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले.
बस टर्मिनलची आवश्यकता नाही, असे पालिकेने लिहून दिलेले आहे : शेळके
सोलापूर महापालिकेने आठ वर्षांपूर्वी या ठिकाणी सिटी बस टर्मिनलची आवश्यकता नाही, असे सांगून आरक्षण उठविले होते. तसेच, महापालिकेला मोबदल्यात काही जागाही देऊ केलेली आहे. जागा खरेदी करताना महापालिकेकडून सर्व प्रकारची ‘ना हरकत’ प्रमाणपत्रे घेतलेली आहेत. आता पुन्हा माझ्या त्याच जागेवर पूर्वीचे बस टर्मिनलचे आरक्षण टाकण्यात आलेले आहे, असे जागामालक संजय शेळके यांनी सांगितले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.