Raju Shetti, Jayant Patil News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hatkanangle Politics : शेट्टींचे 'एकला चलो रे', राष्ट्रवादीची वेगळीच चाचपणी; 'इंडिया'चा उमेदवार ठरेना ?

Raju Shetti News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे.

Amol Jaybhaye

राहुल गडकर

Kolhapur Politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. पालकमंत्री केसरकर यांनी विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या मतदारसंघात निधीची बरसात करून गड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. एकीकडे भाजप व शिंदे गटाने आतापासूनच लोकसभेची पेरणी सुरू केली आहे. तर दुसरीकडे 'इंडिया' आघाडीला उमेदवार मिळेना. राष्ट्रवादीने स्वतंत्र चाचपणी सुरू केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांचे 'इंडिया' आघाडीसोबत जाण्यास अजून तळ्यात मळ्यात असल्याने राष्ट्रवादीने त्यांना बेदखल करण्यास सुरुवात केली आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात कोणता उमेदवार आहे ? हे कळायला मार्ग नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे पुत्र प्रतीक पाटील यांची चाचपणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सुरू आहे. शिराळा आणि इस्लामपूरमध्ये सध्या राष्ट्रवादी बळकट आहे. विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे असल्याने प्रतीक पाटील यांना त्या ठिकाणी फारसा धोका नसल्याचे चित्र आहे. शिवाय शाहूवाडी-पन्हाळा या मतदारसंघातून महाविकास आघाडीची ताकद पाटील यांच्या मागे उभे राहू शकते.

हातकणंगले विधानसभा मतदारसंघात आघाडीकडून माजी आमदार राजीव आवळे आणि आमदार राजू बाबा आवळे यांची ताकदही पाटलांना मिळू शकते. शिरोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते पाटील यांच्या बाजूने राहू शकतात. या लोकसभा विधानसभा मतदारसंघांमध्ये शेतकरी वर्ग जास्त असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या बाजूने त्यांचा कल राहण्याचा अंदाज आहे. या संपूर्ण गोष्टीचा अंदाज घेऊनच जयंत पाटील हे आपल्या पुत्रासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची चाचणी करत असल्याची चर्चा आहे.

शिवाय आपल्या पुत्राचा 'पार्थ' होऊ नये, याची काळजी घेताना दिसत आहेत. जयंत पाटील यांचीच भूमिका या मतदारसंघात महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडे राजू शेट्टी यांनी प्रागतिक विकास मंचची स्थापना करून 'इंडिया' आघाडीपासून सवता सुभा मांडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. इंडिया व प्रागतिक विकास मंचची भाजप (BJP) विरोधी भूमिका असल्याने प्रागतिक विकास मंचचे आमदार जयंत पाटील यांनी आपण इंडिया आघाडीत असल्याचे सांगितले आहे. मात्र, शेट्टी हे एमएसपीच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीसोबत फारकत घेत आहेत.

त्यांनी मतदारसंघात स्वतंत्र गाठीभेटी सुरू करून लोकसभेची तयारी सुरू ठेवली आहे. शेट्टीच्या या भूमिकेमुळे 'इंडिया' आघाडीतील त्यांचा प्रवेश अजून तळ्यात मळ्यात असल्याचे दिसून येते. त्यामुळे राष्ट्रवादीने आतापासूनच त्यांना बेदखल करण्यास सुरुवात केली आहे. जर प्रागतिक विकास मंच 'इंडिया' आघाडीत असेल तर इंडिया आघाडीकडून हातकणंगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीला सोडला जाईल, अशी ही चर्चा आहे. मात्र, शेट्टींच्या भूमिकेमुळे इंडिया आघाडीचा पेच या जागेवरून कायम असल्याचे दिसून येते.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT