Kolhapur News : छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला तात्काळ अटक करा, अन्यथा कोल्हापूर दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना गनिमी काव्याने अडवणार असल्याचा इशारा इंडिया आघाडीच्या बैठकीत देण्यात आला आहे.
कोल्हापुरात शासकीय विश्रामधाम येथे सोमवारी (ता.3) इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार झाली. या बैठकीत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरचा निषेध करण्यात आला. 25 फेब्रुवारी प्रशांत कोरटकर याने सावंत यांना फोन करून मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला होता.
यावेळी झालेल्या संभाषणात कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य केले होते. यानंतर कोल्हापूरसह महाराष्ट्रातील शिवप्रेमींमध्ये संतप्त भावना उमटली होती. इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांनी कोल्हापुरात कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केलेला आहे. मात्र अद्यापही कोरटकर फरार असून त्याला अटक झालेली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या 6 मार्चला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री कोल्हापुरात येण्याआधी प्रशांत कोरटकर याला अटक करावी अन्यथा इंडिया आघाडीच्या वतीने गनिमी काव्याने मुख्यमंत्र्यांना अडवणार असल्याचा इशारा शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी दिला.
या बैठकीला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर प्रमुख आर के पवार अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणामुळे मुख्यमंत्री फडणवीसांचा कोल्हापूर दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे.
इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्या धमकी प्रकरणानंतर डॉ. प्रशांत कोरटकर हा फरार आहे. अटकपूर्वक जामीन मिळवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात त्याने अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांचा 11 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. 11 मार्चनंतर कोणत्याही क्षणी कोरटकर यांना अटक होऊ शकते.
तत्पूर्वी,रविवारी (ता.2) सायंकाळी कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे माझे प्रेरणास्त्रोत आहेत. अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल करून कारवाईची भीती असलेल्या कोरटकर यांनी या प्रकरणाबाबत आपण अन्नभिन्न असल्याचे दाखवून दिलं आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारची माफी कोरटकर यांनी मागितलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.