Hasan Mushrif  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : मुश्रीफांना एकाकी पाडून जनसुराज्य, भाजप अन जनता दलाची युती; गडहिंग्लजमध्ये विधानसभेची परतफेड होणार!

Janta Dal Vs Hasan Mushrif : गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीत जनता दल, जनसुराज्य आणि भाजप अशी आघाडी निश्चित झाली असून या निर्णयामुळे हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकाकी पडले आहेत. ते शरद पवार गटाशी जवळीक साधत आहेत.

Rahul Gadkar
  1. गडहिंग्लज नगरपालिकेसाठी जनता दल, जनसुराज्य आणि भाजप अशी आघाडी अधिकृतपणे आकाराला आली असून या निर्णयामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकाकी पडली आहे.

  2. आघाडी उभी राहण्यासाठी आमदार विनय कोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

  3. आघाडी जाहीर होताच भाजपचे दोन पदाधिकारी भमानगोळ आणि गायकवाड यांनी पक्षत्याग करून राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला, तर समरजित घाटगे यांच्यासाठी राजकीय धर्मसंकट निर्माण झाले आहे.

Kolhapur, 15 November : गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीसाठी जनता दल भाजपसोबत रिंगणात असणार आहे. त्याला आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्तीची साथ मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार विनय कोरे यांच्या मार्फत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी सुरू असलेल्या चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब झाले, त्यामुळे नगरपालिकेमध्ये जनता दल, जनसुराज्य व भाजप अशी आघाडी आकाराला आली आहे.

या निर्णयामुळे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे गडहिंग्लज नगरपालिकेमध्ये एकाकी पडले आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी एकत्र येण्याच्या तयारीत आहेत.

काही महिन्यांपूर्वी निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच जनता दलाच्या नेत्या स्वाती कोरी यांनी जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांची भेट घेतली होती. त्याचवेळी दुसऱ्या बाजूने मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही कोरी यांनी भेट घेऊन जनता दल, जनसुराज्य व भाजप असे एकत्रित येऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानंतर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी जनता दलासोबत पहिल्या टप्प्यातील चर्चाही सुरू केली.

प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांची स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन महायुती म्हणून निवडणूक लढविण्याचा प्रस्तावही दिला होता. दरम्यान, जनता दल, जनसुराज्य व भाजप अशा रचनेद्वारे निवडणुकीला सामोरे जाण्यामागची भूमिका होती, ती आमदार विनय कोरे यांची होती.

जनसुराज्यचे शिष्टमंडळ भेटीसाठी गेल्यानंतरही त्यांना कोरे यांनी असेच संकेत दिले होते. विशेष म्हणजे पहिल्याच भेटीत मंत्री पाटील, आमदार कोरे व कोरी यांच्यात या आघाडीसाठी सकारात्मक पाऊल पडल्याची चर्चा आता बाहेर पडू लागली आहे.

मंत्री पाटील, खासदार धनंजय महाडिक व आमदार कोरे यांच्यात जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीसंदर्भात झालेल्या चर्चेवेळी जनता दलासोबत जाण्याचा जनसुराज्य शक्ती पक्षाने निर्णय घेतला असून, भाजपनेही त्यात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा आमदार कोरे यांनी केली.

आघाडी होताच भाजपला धक्का

त्या शिष्टमंडळात विठ्ठल भमानगोळ आणि अनिल गायकवाड यांचाही समावेश होता. भमानगोळ यांनी तर काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या सहकारी उमेदवारासोबत प्रचारही सुरू केला आहे. दरम्यान, भाजप आणि जनता दलाची आघाडी झाल्याचे जाहीर होताच आज भमानगोळ व गायकवाड यांनी पक्षत्याग करीत असल्याचे पत्रक दिले आहे.

आम्ही भाजपचे पदाधिकारी व सदस्य होतो. पालिका निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी मागूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नाराज होऊन सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत. महायुतीतील घटकपक्ष राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून त्या पक्षातर्फे निवडणूक लढविण्याचा आम्ही निर्धार केल्याचे पत्रकात म्हटले आहे.

समरजित घाटगे धर्मसंकटात

विधानसभेच्या निवडणुकीत जनता दल हा समरजीत घाटगे यांच्या मागे ताकदीने राहिला होता. नगराध्यक्षा प्रा. कोरी यांनी घाटगे यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले होते. शिवाय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. गडहिंग्लजमध्ये राष्ट्रवादी व जनता दलामध्ये टोकाचा संघर्ष सुरू आहे.

जनता दलाच्या ‘धर्मनिरपेक्ष’तेची चौकट बाजूला ठेवून पूर्वाश्रमीचा मित्रपक्ष असणाऱ्या ‘जनसुराज्य’चे संस्थापक आमदार विनय कोरे यांच्या माध्यमातून भाजपशी हात मिळवून मुश्रीफांना नगरपालिकेच्या सत्तेपासून दूर ठेवण्याचा निर्णय कोरींना घेतला आहे. त्यामुळे विधानसभेतील मदतीची परतफेड कशी करायची? अशा धर्मसंकटात शाहू ग्रुपचे प्रमुख समरजित घाटगे अडकले आहेत.

1. गडहिंग्लजमध्ये कोणकोणत्या पक्षांची आघाडी झाली आहे?

जनता दल, जनसुराज्य शक्ती आणि भाजप यांची तीनपक्षीय आघाडी झाली आहे.

2. या आघाडीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका कोणी बजावली?

आमदार विनय कोरे यांनी या आघाडीची मुख्य भूमिका निभावली.

3. आघाडी जाहीर झाल्यावर भाजपमध्ये काय घडले?

भाजपचे विठ्ठल भमानगोळ आणि अनिल गायकवाड यांनी पक्षत्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

4. समरजित घाटगे ‘धर्मसंकटात’ का अडकले आहेत?

कारण विधानसभा निवडणुकीत साथ देणाऱ्या जनता दलाने आता भाजपसोबत हातमिळवणी करून मुश्रीफ यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT