Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur News : सरकारच्या कोटींच्या घोषणा; मात्र शेतकऱ्यांना काही मिळत नाही : जयंत पाटलांचा हल्लाबोल

सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने लोकांना दिलेली आश्वासने पाळली जात नाहीत

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर : राज्यातील सरकार शेकडो कोटींच्या घोषणा करीत आहेत. तरीही शेतकऱ्यांना काही मिळत नाही. या सरकारने पुन्हा ७५ हजार कोटी रुपयांचा पुरवणी अर्थसंकल्प मांडला आहे. सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याने लोकांना दिलेली आश्वासने पाळली जात नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आज केली. (Jayant Patil criticizes Shinde-Fadnavis government)

पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथे सहकार शिरोमणी वसंतराव काळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते. या वेळी श्रीराम शिक्षण संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या विस्तारित इमारतीचे उद्‌घाटन आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच श्रीराम शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या ग्रामीण भागातील मुलींसाठी सुरु केलेल्या सायकल बँकेचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी खो खो स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील जानकी पुरस्कार मिळवलेल्या प्रीती अशोक काळे हिचा सत्कारश्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

पाटील म्हणाले की, देशात महागाई वाढते आहे, पेट्रोल शंभर रुपयेच्या पुढे गेले . दळणवणाची साधने महागली, प्रवास महागला मात्र उत्पन्न वाढले नाही. देशपातळीवर वार्षिक सर्व्हेक्षण झाले आहे, त्यानुसार भारतातील लोकांचे आणि शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न दरवर्षी घटत आहे. सध्या अनेक ज्वलंत प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिले आहेत.

केंद्रात मनमोहनसिंग सरकार आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार असताना दरवर्षी शेतमालाच्या किमती वाढत होत्या, त्याकाळातच ग्रामीण भागात ट्रॅक्टर आणि कारची सर्वाधिक विक्री झाली. मनमोहनसिंग सरकारचे धोरण शेतकऱ्यांच्या हातात पैसे यावेत असे होते. त्या दहा वर्षात विविध योजनांतून ग्रामीण भागात जास्त पैसे आले, मात्र सद्याच्या सरकारचे धोरण आपल्यां हिताचे नाही. (स्व.) वसंतराव काळेंनी सरपंच, मार्केट कमिटी, पंचायत समिती, विठ्ठल सहकारी, चंद्रभागा सहकारीच्या माध्यमातून लोकांच्या विकासासाठी प्रयत्न केले. शिक्षणाची व्यवस्था केली. आता कल्याणराव काळे सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत, असेही पाटील म्हणाले.

कल्याणराव काळे म्हणाले की, या भागातील युवकांना रोजगार, विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी श्रीराम शिक्षण संकुल प्रयत्नशील आहे. नवीन इंग्लिश मिडीयम सुरू केले. सायकल बँकिंग योजना सुरू केली. तीस सायकली मुलींना वाटप‌‌ केल्या आहेत.

यावेळी आमदार बबनदादा शिंदे, यशवंत माने, माजी आमदार दीपक साळुंखे, राष्ट्रवादी उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, युवराज पाटील, भगीरथ भालके, ऍड. गणेश पाटील, समाधान काळे, विजयसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, महादेव देठे, कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT