सांगलीच्या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे राजकीय वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपने मागील काही दिवसांत एकापाठोपाठ एक पाच मोठे डाव टाकले. सहकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि प्रशासकीय निर्णयांच्या माध्यमातून जयंत पाटील यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला.
या कोंडीमुळे तब्बल 17 वर्षे मंत्री राहिलेले, रेकॉर्डब्रेक वेळा राज्याचा अर्थसंकल्प मांडलेले जयंत पाटील आता व्यथित झालेले दिसले. याच अगतिकतेतून ते पहाटे तीन वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले होते. पण आता पाटील यांनी तीन लढायांमध्ये बाजी मारत जोरदार पुनरागमन केले आहे. आता चौथी लढाई मिरज पंचायत समिती सभापतीपदाची असून, त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
पहिला हल्ला : जिल्हा बँकेच्या भरतीवर स्थगिती
भाजपच्या आमदारांकडून जयंत पाटील यांची सत्ता असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेला लक्ष्य केले जात आहे. सातत्याने वेगवेगळे आरोप करत बँकेच्या चौकशीची, बँकेवर कारवाईची मागणी सुरु असते. अशात बँकेच्या नोकरभरतीला स्थगिती आल्याने जयंत पाटील गटाला मोठा धक्का बसला होता. मात्र न्यायालयाने नंतर ही स्थगिती उठवली आणि भरती प्रक्रियेला हिरवा कंदील मिळाला. त्यामुळे जयंत पाटील यांनी पहिली लढाई जिंकली.
दुसरा हल्ला : सांगली बाजार समितीचे त्रिभाजन
राज्य सरकारने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सांगली, जत आणि कवठेमहांकाळ अशा तीन समित्यांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, खासदार विशाल पाटील, जयंत पाटील यांच्या सहकारातील प्रभावाला मोठा धक्का बसला. बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त झाले. मात्र कोल्हापूर सर्किट बेंचने या त्रिभाजनाला नुकतीच स्थगिती दिली. त्यामुळे विद्यमान संचालक मंडळाला मोठा दिलासा मिळाला आणि जयंत पाटील गटाने दुसरी लढाईही जिंकली.
तिसरा हल्ला : ईश्वरपूरच्या नगराध्यक्षांची अपात्रता
ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना अवैध बांधकामाप्रकरणात सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांना अपात्र ठरवण्यात आले. या निर्णयामुळे जयंत पाटील यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच धक्का बसला होता. यामागे शिवसेनेच्या जयकर जाधव यांच्या तक्रारीसोबत भाजपची रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यानंतर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. अखेर शिंदे यांनी मलगुंडे यांच्या अपात्रतेला स्थगिती दिली. त्यामुळे जयंत पाटील यांनी सलग तिसरा राजकीय डावही आपल्या बाजूने फिरवला.
आता चौथी चाल : मिरज पंचायत समिती
जयंत पाटील गटाचे लक्ष आता मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदावर आहे. मिरज पंचायत समितीच्या २२ सदस्यीय सभागृहात काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना यांच्या आघाडीकडे ११ सदस्य, तर भाजप-शिवसेना युतीकडेही ११ सदस्य होते. अशा परिस्थितीत १० मार्च रोजी सभापती निवडीच्या वेळी बुधगावचे शिवसेना सदस्य पांडुरंग इंगळे हे गैरहजर राहिल्याने आघाडीच्या तन्वी कमलेकर यांची सभापती, तर ललिता शेजुळ यांची उपसभापतीपदी निवड झाली होती.
मात्र, सभापती निवडीपूर्वी पांडुरंग इंगळे यांचे अपहरण करून त्यांना जाणीवपूर्वक गैरहजर ठेवण्यात आल्याचा आरोप करत या निवडी पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाने नुकतीच रद्द ठरवल्या. त्यानंतर पुर्ननिवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. येत्या ४ ऑगस्ट रोजी ही निवडणूक होणार आहे. या निवडीच्या निमित्ताने भाजप आमदार सुरेश खाडे यांची परीक्षा असणार आहे तर महाविकास आघाडीचे खासदार विशाल पाटील व आमदार जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
जयंत पाटलांना राजकीय बळ मिळणार?
भाजप आणि महायुतीकडून जयंत पाटील यांचे सहकार आणि स्थानिक राजकारणातील वर्चस्व कमी करण्याचे प्रयत्न अद्याप थांबलेले नाहीत. त्यामुळे पुढील काही महिन्यांत आणखी एका महत्त्वाच्या राजकीय संघर्षाची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर चौथ्या लढाईचा निकाल जयंत पाटील यांच्या राजकीय पुनरागमनाला आणखी बळ देणार की भाजपला नवी संधी मिळवून देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.