

- शांताराम पाटील
Jayant Patil : सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगरपालिकेचे अपात्र नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईला नगरविकास विभागाने स्थगिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जयंत पाटील यांनी याबाबत काहीच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. नगरविकास विभागाच्या या निर्णयानंतर आमदार पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसत आहे.
सांगलीचे जिल्हाधिकारी मैनाक घोष यांनी आनंदराव मलगुंडेंना अनधिकृत बांधकाम प्रकरणात अपात्र ठरवले होते. पेठ-सांगली मार्गावरील हॉटेल आणि लॉजच्या कथित अनधिकृत बांधकाम प्रकरणात ही कारवाई केली होती. या निर्णयामुळे जयंत पाटील यांना स्वतःच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला होता. त्यानंतर त्यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर अपात्र नगराध्यक्षांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन दाद मागितली होती.
या दोन्ही बैठकीत अपात्रतेच्या निर्णयाबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती दिल्याने त्या भेटीला राजकीय यश मिळाल्याची चर्चा रंगली आहे. या स्थगितीमुळे आनंदराव मलगुंडे यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी अपात्रतेच्या प्रकरणावरील अंतिम निर्णय पुढील सुनावणीनंतर होणार आहे.
जयंत पाटील यांनी आणखी एक लढाई जिंकली?
यापूर्वी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरती प्रक्रियेवरील स्थगिती न्यायालयाने उठवली होती. त्यानंतर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाच्या राज्य सरकारच्या निर्णयालाही मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने स्थगिती दिली. आता ईश्वरपूर नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अपात्रतेच्या आदेशालाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिल्याने जयंत पाटील यांच्या पाठपुराव्याला आणखी एक यश मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांची भाजपवर कुरघोडी?
ईश्वरपूर नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अपात्रतेच्या प्रकरणाने सुरुवातीपासूनच सांगलीच्या महायुतीच्या राजकारणात खळबळ उडवली होती. शिवसेनेचे ईश्वरपूर विधानसभा प्रमुख जयकर जाधव यांनी या प्रकरणाची तक्रार केली असली, तरी या संपूर्ण हालचालीमागे भाजपची रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
विशेषतः आमदार जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता एकनाथ शिंदे यांनीच जिल्हाधिकाऱ्यांच्या अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती दिल्याने भाजपच्या भूमिकेवर शिवसेनेनेच अप्रत्यक्षपणे कुरघोडी केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.