Jayant Patil in Mangalwedha Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mangalvedha NCP : मंगळवेढ्यात राष्ट्रवादीला उभारी देणाऱ्या मृत अध्यक्षाच्या कुटुंबीयांचे चार महिन्यांनी सांत्वन

Jayant Patil And P. B. Patil : मंगळवेढा दौऱ्यावरील जयंत पाटलांनी घेतली पी. बी. पाटलांच्या कुटुंबाची भेट

हुकूम मुलाणी

Solapur Political News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाया कार्यकर्ते आहेत, असे नेतेमंडळी वारंवार बोलत असतात, तर दुसरीकडे तालुकाध्यक्षाच्या मृत्यूला काही महिने झाले तरी कुणी त्याच्या कुटुंबाकडे फिरकतही नाही, अशी चर्चा मंगळवेढ्यात सुरू होती. मात्र, चार महिन्यांनी का होईना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिवंगत तालुकाध्यक्ष पी. बी. पाटलांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान, या प्रकरणाची तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (Latest Political News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर मंगळवेढ्यातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवारांना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, स्वर्गीय रतनचंद शहा यांच्यानंतर दिवंगत पी. बी. पाटील यांनी कायम पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर काही दिवस तालुकाध्यक्ष म्हणूनही पाटलांनी प्रभावीपणे काम केले. तालुक्यात झालेल्या अनेक सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी अडचणीच्या वेळी पक्षाला उभारी मिळवून दिली. यात त्यांनी पक्षासाठी मोठी आर्थिक झळ सोसल्याचेही सांगण्यात येते.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राजकारणामध्ये त्यांना सभापतिपदाची संधी द्यावी, अशी मागणी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केली होती. या निवडीचे अधिकार वरिष्ठ नेत्यावर सोपवले होते. मात्र, वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या बंद लिफाफ्यात दुसऱ्याचेच नाव असल्याने पाटलांची संधी हुकली. दरम्यान, ज्यांना संधी दिली त्यांनीही राष्ट्रवादीची साथ सोडली. परिणामी २००९ नंतर दहा वर्षे राष्ट्रवादीला या मतदारसंघात अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, २०१९ मध्ये भारत भालके यांच्या रूपाने राष्ट्रवादीला पुन्हा आमदार मिळाला. मात्र, त्यांच्या अकाली निधनानंतर पक्षाला अद्यापही सूर गवसला नाही. (Maharashtra Political News)

पक्षाच्या अशा अनेक चढउतारात पी. बी. पाटलांनी मोठी कामगिरी बजावली. तालुक्यातील पक्षांतर्गत गटबाजी व अनेक इच्छुक, दावेदारांना शांत करण्याच्या दृष्टीने पाटलांना पुन्हा तालुकाध्यक्ष केले. मात्र, २५ मे रोजी पुणे येथील काम उरकून घराकडे परतताना यवत (ता. दौंड) येथे त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यात गंभीर जखमी झाल्याने पाटील यांचा मृत्यू झाला. परिणामी राष्ट्रवादी पक्षाची मंगळवेढ्यात बसलेली घडी पुन्हा विस्कटली आहे.

दरम्यान, एका बाजूला राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते कार्यकर्त्यांबाबत आपण किती संवेदनशील आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र, मंगळवेढा तालुकाध्यक्षाच्या अपघाती निधनानंतरही सांत्वन करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील एकही पदाधिकारी त्यांच्या कुटुंबाकडे फिरकला नाही. आता तब्बल चार महिन्यांनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पाटील यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मात्र, पक्षनिष्ठा असलेल्या एका कार्यकर्त्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबास भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना चार महिन्यांचा वेळ लागावा का, याचीच चर्चा तालुक्यात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT