Jayant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur NCP Melava : राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून जयंत पाटील फुंकणार विधानसभेचे रणशिंंग; ‘शहर मध्य अन उत्तर’बाबत काय बोलणार?

Vijaykumar Dudhale

Solapur, 18 July : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज (ता. 18 जुलै) सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून ते विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर दावा केला जात आहे. तसेच, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून महेश कोठे हे विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. यासंदर्भात जयंत पाटील कोणते भाष्य करणार, याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मोठ्या नेत्याचा प्रथमच सोलापूरला (Solapur) दौरा होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील यशाचा टेंपो टिकवून ठेवण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचा प्रयत्न जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मेळाव्याच्या निमित्ताने होणार आहे.

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबतच माढ्याचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. विशेषतः मतदार संघावर दावा करण्यासाठी सोलापुरातील महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सध्या रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सोलापूर शहर मध्य या मतदारसंघावर तौफिक शेख यांच्या माध्यमातून दावा करण्यात आला आहे.

‘सोलापूर शहर उत्तर’ मधून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी माझी महापौर तथा पक्षाचे वरिष्ठ नेते महेश कोठे यांनी गेल्या वर्षभरापासून चालवली आहे, त्यामुळे या मेळाव्यात जयंत पाटील हे याबाबत भाष्य करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महाविकास आघाडीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनीही सोलापूर शहर मध्य मतदारसंघावर दावा केला आहे. मुळात ह्या मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या तीन वेळा निवडून आल्या आहेत, त्यामुळे काँग्रेसचाही या मतदारसंघावर दावा असणार आहे. त्यासोबतच आता माकप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही या मतदारसंघावर दावा करण्यात आल्याने सोलापूरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

या पार्श्वभूमीवर जयंत पाटील हे सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन त्यांना आगामी निवडणुकीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. त्याचवेळी विधानसभा निवडणुकीची दिशाही या मेळाव्यतून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT