Satara ZP Election : संपूर्ण सातारा जिल्ह्यात भाजपचे पर्यायाने आपल्या विचारांचे जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यासाठी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे सज्ज झाले आहेत. त्यांनी माण तालुक्यासह माण मतदारसंघात क्लीन स्वीपचा निर्धार केलेला आहे. त्यामुळे दुभंगलेली राष्ट्रवादी हे आव्हान कसे पेलणार हा मोठा प्रश्न आहे, तर शेखर गोरेंचा स्वबळाचा नारा शेवटपर्यंत टिकणार का? ते किती गट व गण लढवणार की बंधू जयकुमार गोरे यांच्याशी जुळवून घेणार हे पाहावे लागणार आहे.
माणच्या राजकारणात २००७ मध्ये जयकुमार गोरे यांचा प्रवेश झाल्यानंतर आंधळी गटातून विजय मिळवत त्यांनी राजकीय वाटचाल सुरू केली. त्यानंतर सलग चार विधानसभा जिंकत त्यांनी ग्रामविकासमंत्री पदापर्यंत झेप घेतली. मात्र, या राजकीय वाटचालीत त्यांना एकदाही माण पंचायत समितीवर एकहाती सत्ता स्थापन करता आलेली नाही, तसेच एकदाही दोनपेक्षा जास्त जिल्हा परिषद गट निवडून आणता आलेले नाहीत. माण पंचायत समिती, तसेच जिल्हा परिषद गटांवर राष्ट्रवादी काँग्रेसने कायम आपला वरचष्मा राखला. विशेषतः मार्डी, गोंदवले बुद्रुक व कुकुडवाड गट नेहमीच राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिले आहेत.
ही सल दूर करण्याचा प्रयत्न यावेळी जयकुमार गोरे निकराने करणार यात शंका नाही. त्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील. यंदा त्यांच्याकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची रांग लागलेली आहे. मात्र यावेळी उमेदवारी देताना ते कोणताही धोका पत्करणार नाहीत अन् आपल्याला हवा तोच उमेदवार देतील हे इच्छुकांनाही माहिती आहे. अशा स्थितीत राष्ट्रीय समाज पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (दोन्ही), वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी आदी पक्ष स्वतंत्र लढणार की कोणाशी युती, आघाडी करून सत्तेचं माप पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करणार हे पाहावे लागणार आहे.
तयारी विधान परिषदेची?
शेखर गोरे यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे. मतदारसंघातील औंध गटातून पत्नी सोनल गोरे यांच्यासाठी ते आग्रही आहेत. याच वेळी बालेकिल्ला असलेल्या आंधळी गटासह बिदाल गटातून ताकदीने लढण्याचा त्यांचा मानस आहे, अशी चर्चा आहे. ते सर्व गट व गण लढणार की वरिष्ठांच्या आदेशानंतर बंधू जयकुमार गोरे यांच्याशी तडजोड करणार यावर पुढील गणिते अवलंबून आहेत. कारण शेखर गोरे यांचे मुख्य ध्येय हे विधान परिषदेची उमेदवारी आहे. त्यासाठी ते तडजोड करण्याची शक्यता आहे.
गोरेंविरोधी कार्यकर्त्यांना चिंता
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र सर्व काही अलबेला नाही. प्रभाकर देशमुख यांची भूमिका सध्या स्पष्ट नसली, तरी लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. अनिल देसाई यांनी यापूर्वीच प्रवेश केला आहे. दुसऱ्या फळीच्या बहुतेक नेत्यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची वाट धरली आहे, तर अभयसिंह जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची धुरा खांद्यावर घेतली आहे. त्यामुळे या परिस्थितीत राष्ट्रवादीचं काय होणार? याची चिंता जयकुमार गोरेविरोधी कार्यकर्त्यांना लागली आहे.
विरोधकांचा कस लागणार
सत्तेसोबत तगडे मंत्रिपद ताब्यात असलेल्या जयकुमार गोरे यांची ताकद कैकपटीने वाढलेली आहे, तर पक्षाची शकले उडाल्याने, मेळ नसल्याने व एकनिष्ठ कार्यकर्त्यांची ताकद पाठीमागे नसल्याने यंदाची निवडणूक विरोधकांचा कस लावणारी ठरेल, हे मात्र नक्की.
बहुरंगी लढतींचे संकेत
जयकुमार गोरे हे माण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण भाजपच्या ‘कमळ’ या चिन्हावरच निवडून आणण्याचा प्रयत्न करणार यात शंका नाही. त्यामुळे महायुती होणार नाही हे स्पष्ट आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना एकत्र येऊन लढण्याशिवाय पर्याय नाही. बहुतेक ठिकाणी मुख्यतः तिरंगी, चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे.
नेतृत्वांची उलथापालथ
मागील निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये असणारे जयकुमार गोरे हे भाजपमध्ये आहेत. राष्ट्रवादीत असणारे शेखर गोरे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. भाजपचे अनिल देसाई राष्ट्रवादीत गेले आहेत. प्रभाकर देशमुख यांचा राजकारणात प्रवेश झाला असून, ते राष्ट्रवादीत आहेत, तर अभयसिंह जगताप यांनी सुद्धा राजकीय वाटचाल सुरू करताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जबाबदारी घेतली आहे. राष्ट्रवादीत असणारे डॉ. संदीप पोळ भाजपवासी झाले असून, मनोज पोळ हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मध्ये आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.