Jaykumar Gore Solapur Tour  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gore-Mane : जयकुमार गोरेंनी मैत्रीचा धर्म निभावला; पण मानेंकडील स्नेहभोजनाला ‘या’ नेत्यांच्या हजेरीमुळे चर्चेला तोंड फुटले!

Jaykumar Gore Solapur Tour : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू आहे. गोरे यांच्या माध्यमातून बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार, याची उत्सुकता आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 03 April : काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या घरी स्नेहभोजनाला हजेरी लावून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मैत्रीचा धर्म निभावला खरा मात्र या ‘डिनर डिप्लोमासी’ची खमंग चर्चा सोलापुरात सध्या सुरू आहे. माने यांच्याकडील ‘डिनर डिप्लोमासी’ला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आजी-माजी आमदार उपस्थित होते. या नेत्यांच्या उपस्थितीची चांगलीच चर्चा सोलापूरच्या राजकारणात रंगली आहे.

सोलापूरच्या दौऱ्यावर असलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज (ता. ०३ एप्रिल) माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांच्या होटगी रोडवरील ‘सुमित्रा’ या निवासस्थानी स्नेहभोजन घेतले. तत्पूर्वी सकाळीच शासकीय विश्रामगृहात जाऊन माजी आमदार माने यांनी पालकमंत्री गोरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे सोलापूरच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली होती.

भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना जयकुमार गोरे (jaykumar Gore) यांनी ‘माने यांच्याकडील जेवणाबाबत स्पष्टीकरण दिले होते. मी कोणाकडेही जेवायला गेलो, तरी अगोदर भाजपा कार्यकर्त्याच्या काम होईल. सुभाषबापू मी सोलापूर जिल्ह्यात व्यक्तिगत राजकारण करायला आलो नाही. आपण माझ्यापेक्षा पक्षात आणि संघटनेतही खूप ज्येष्ठ आहात, काही चिंता करू नका, मी पक्षासाठीच काम करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

मेळाव्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी दिलीप माने यांच्या निवासस्थानी जाऊन स्नेहभोजनाचा आनंद घेतला. गोरे येण्यापूर्वी त्या ठिकाणी बार्शीचे आमदार दिलीप सोपल, माजी आमदार राजन पाटील, शिवाजीराव काळुंगे उपस्थित होते. गोरे आल्यानंतर निवेदन देण्यासाठी माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण ढोबळे हेही त्या ठिकाणी आले, त्यानंतर या सर्व नेत्यांची डिनर डिप्लोमसी रंगली. एकाच टेबलावर बसून जेवण करणाऱ्या या नेत्यांची चांगलीच चर्चा रंगली हेाती.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू आहे. उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीची धुरा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याशेट्टीच्या खांद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे गोरे यांच्या माध्यमातून बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक लागणार, याची उत्सुकता आहे.

दुसरीकडे, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची नुकसानीची वसुली सुरू आहे, त्याप्रकरणी माजी अध्यक्ष आणि संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. बॅंकेच्या नुकसानाची वसुली अधिकारी आणि संचालकांकडून करण्यात येत आहे. त्यात माजी आमदार दिलीप माने, राजन पाटील, दिलीप सोपले हे बॅंकेचे माजी अध्यक्ष उपस्थित होते. त्यामुळे त्यांचीही चर्चा झाली काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT