Satara, 04 August : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचे पडघम जोराजोरात वाजू लागले असून जिल्ह्यातील सोसायट्यांमध्ये मतदान प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव करण्यात येत आहेत. हे ठराव घेत असताना आगामी निवडणुकीतील चुरशीची चुणूक दिसून येत आहे. त्याच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरातून सातारा डीसीसी बॅंकेच्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. सातारा जिल्हा बॅंकेचा गुलाल लावूनच सोलापूर डीसीसी बॅंकेचा गुलाल उधळण्यासाठी येईन, असे स्पष्ट केले आहे, त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद निवडणुकीची पुनरावृत्ती होणार की सामंजस्याचे राजकारण दिसणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव सादर करण्याची अंतिम मुदत ५ ऑगस्टपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
मतदान प्रतिनिधी नियुक्ती ठरावाच्या माध्यमातून उद्यापर्यंत प्रारूप मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा बँकेच्या 1,764 मतदारांवर आधारित 10 मतदारसंघांमध्ये कोणाचे वर्चस्व राहणार, हे ठरावाच्या माध्यमातून स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा बँकेवर वर्चस्व होते. मात्र, केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपकडून आपल्या बाजूने ठराव व्हावेत, यासाठी सर्व बाजूंनी फिल्डिंग लावली आहे. ठराव आपल्या बाजूने मिळविण्यासाठी भाजपने संघटनात्मक पातळीवर मोठी रणनीती आखली आहे.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत हाती बहुमत नसतानाही फोडाफोडी करून भाजपने आपला अध्यक्ष झेडपीत बसवला. वास्तविक महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे बहुमत असूनही भाजपने सत्तेसाठी आक्रमक धोरण अवलंबिले होते. त्याची सर्व सूत्रे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी हलवली होती. जिल्हा परिषदेत झालेल्या घडामोडीची धास्ती या दोन्ही पक्षाला जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतही असणार आहे.
जिल्हा परिषद सत्तेच्या वेळी पडद्याआडून सूत्रे हलविणारे जयकुमार गोरे यांनीच पुन्हा एकदा साताऱ्यात गुलाल उधळण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे भाजप सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक स्वतंत्र लढविणार की महायुती म्हणून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोबत घेऊन लढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतदान प्रतिनिधींचे ठराव घेतानाच भाजपचे आक्रमक विस्तारवादाचे दर्शन होताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी पोलिस बंदोबस्तात ठराव झाले आहेत, तर महाविकास आघाडीचे बहुमत असूनही काही ठिकाणी भाजपच्या बाजूने ठराव झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत काय चित्र असणार याची उत्सुकता जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीवेळी झालेल्या घडामोडी असणार आहे.
अनेक ठिकाणी विद्यमान समीकरणांना धक्का बसत आहे. काही संस्थांमध्ये मतदार प्रतिनिधी ठरवताना मोठी चुरस निर्माण झाली असून स्थानिक पातळीवर राजकीय उलथापालथी घडताना दिसत आहेत. ५ ऑगस्टनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील पुढील रणनीती याच ठरावांवर अवलंबून राहणार आहे.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत फलटणमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळक-माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माण-खटावमध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे विरुद्ध प्रभाकर देशमुख, शेखर गोरे व इतर अशी लढत होण्याची शक्यता आहे.
कोरेगाव, जावळी, सातारामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, महेश शिंदे विरुद्ध शशिकांत शिंदे, कराड उत्तरमध्ये भाजप आमदार अतुल भोसले, ॲड उदयसिंह उंडाळकर विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण, कराड दक्षिणमध्ये बाळासाहेब पाटील विरुद्ध भाजप आमदार मनोज घोरपडे, पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाईंना सत्यजितसिंह पाटणकरांचे आव्हान असेल.
वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरमध्ये मदन भोसले विरुद्ध मंत्री मकरंद पाटील, नितीन पाटील असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे झेडपीची पुनरावृत्ती होणार की सामंजस्याचे राजकारण दिसणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.