Satara Eknath Shinde Speech .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Shivsena Sabha: जयकुमार गोरेंनी शिवसेनेच्या नाकावर टिच्चून झेडपीची सत्ता हिरावली, त्याच साताऱ्यातून शिंदेंनी भाजपला ललकारलं; म्हणाले...

Satara Shivsena News: सगळीकडे शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू आहे.शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कोणालाही घाबरू नका. आपला शिवसेना पक्ष मोठं करण्याचं काम करा.गाव तिथं शिवसैनिक अभियान सुरू करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी यावेळी शिवसेनेच्या नेत्यांना दिल्या.

Deepak Kulkarni

Satara News : सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत बहुमत नसतानाही भाजपनं प्रशासनाच्या मदतीनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाकावर टिच्चून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद मिळवलं होतं. त्यावेळी झालेला राडा संपूर्ण राज्यभरात प्रचंड गाजला होता.अधिवेशनातही यावरुन मोठा गदारोळ झाला होता. त्यामुळे साताऱ्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.पण आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साताऱ्यात जाऊन झेडपीतला राडा विसरलो नसल्याचं आपल्या रोखठोक भाषणातून दाखवलं आहे.

सातारा येथील गांधी मैदानावर सोमवारी(ता.20 एप्रिल)उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या नूतन सदस्य सत्कार आणि जाहीर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिंदेंनी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या भाजपवरही टीकेचे आसूड ओढले. ते म्हणाले, सातारा जिल्ह्यात जे राजकारण झालं, ते खालच्या पातळीवरील झाले.साताऱ्यातील जनता हे सहन करणार नाही.साताऱ्याचं रक्त वेगळं आहे.त्यामुळे यावर योग्यवेळी बोलणार असल्याचंही शिंदेंनी धमकीवजा इशारा भाजप नेत्यांना दिला आहे.

एकनाथ शिंदे यांनी यावेळी भाषणात मी साताऱ्याचा सूपुत्र असून जेव्हा कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा होतो असंही म्हटलं. तसेच त्यांनी मी स्वभावाला रोखठोक आणि हिशोबाला चोख आहे,असा अप्रत्यक्ष इशारा एकप्रकारे मंत्री जयकुमार गोरेंसह भाजप जिल्ह्यातील नेत्यांना दिल्याचं या मेळाव्यातून पाहायला मिळालं.

शिवसेनेच्या या मेळाव्यात पालकमंत्री शंभूराज देसाई,उद्योगमंत्री उदय सामंत,आमदार सुहास बाबर,माजी आमदार दीपक चव्हाण,रवींद्र धंगेकर,जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर,संपर्क प्रमुख शरद कणसे,चंद्रहार पाटील,जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पातळी सोडून राजकारण करण्यात आलं.पण कोणीही कितीही दबावाचं राजकारण करू द्या.पण तुम्ही घाबरू नका.निर्धारानं लढा, असा आदेशही त्यांनी साताऱ्यातील सभेतून शिवसेनेच्या नेत्यांना दिला आहे.तसेच त्यांनी यावेळी सत्ता आणि पदे येतात-जातात.पण,नाव गेलं, तर परत येत नाही.त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोणीही झाला असला, तरी लोकांच्या मनातील अध्यक्ष हा आपल्या शिवसेनेचाच असल्याचंच ठणकावून सांगत भाजपला डिवचलं.

एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले,इथे आज मी उपमुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, तर सातारकर म्हणून बोलत आहे.सातारा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता.पण आता ही वेगळीच ‘काँग्रेस’ याठिकाणी असल्याचं सांगत त्यांनी नाव न घेता भाजपला खोचक टोला लगावला.

सगळीकडे शिवसेनेची विजयी घोडदौड सुरू आहे.शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कोणालाही घाबरू नका. आपला शिवसेना पक्ष मोठं करण्याचं काम करा.गाव तिथं शिवसैनिक अभियान सुरू करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी यावेळी शिवसेनेच्या नेत्यांना दिल्या.तसेच आजही मी लोकांमध्ये आजही आहे.घरात बसून पक्ष चालत नाही.मुख्यमंत्री पदाच्या अडीच वर्षांच्या काळात 567 सर्वाधिक निर्णय घेतल्याचंही शिंदे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT