Solapur, 26 January : ड्रग्स कारवाईच्या संदर्भात केलेल्या विधानावरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारेंना सगळा अंधाराच समोर दिसत असल्यामुळे, त्या अंधारात काय चाललं आहे, हे समजत नाही, असा टोला गोरे यांनी लगावला.
साताऱ्यात पुन्हा एकदा ड्रग्जचा साठा मोठ्या प्रमाणात सापडला आहे. त्यावरून अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. त्याला उत्तर देताना पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी ठाकरे सेनेच्या प्रवक्त्या अंधारेंवर टीकास्त्र सोडले आहे.
ते म्हणाले, व्यसनमुक्तीसाठी सरकार मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. त्याचाच भाग म्हणून अशा मोठ्या कारवाया होत आहेत आणि साताऱ्यात घडलेली कारवाई, हे त्याचंच एक प्रतीक आहे. भविष्यात बेकायदेशीर तंबाकू विक्री आणि ड्रग्सवर कडक कारवाई करण्याचे सरकारचे धोरण आहे.
लोकांच्या भावना आणि लोक कोणासोबत आहेत, हे समजून घेतलं पाहिजे. लोकांनी दिलेल्या जनाधाराचा स्वीकार केला पाहिजे. सुषमाताई अंधारे (sushma andhare) ह्या लोकशाही आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भारतीय राज्यघटना मानत असतील, तर त्या मुंबईचा निकाल स्वीकारतील, असा टोलाही गोरेंनी त्यांना लगावला.
महिला आहे म्हणून आम्हाला हलक्यात घेऊ नका, असे विधान सुषमा अंधारे यांनी केले आहे. त्याला उत्तर देताना ‘ताईंना हलक्यात घ्यायचं नाही, त्या किती दिवस धमक्या देणार आहेत, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत,’ असा उपरोधिक टोला त्यांनी अंधारेंना लगावला.
गोरे म्हणाले, इम्तियाज जलील यांच्यासारख्याच्या वक्तव्यांना फार महत्व देण्याची गरज नाही. आज प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना देश महत्वाचा आहे. देशामध्ये सामाजिक ऐक्य महत्वाचं आहे. या सामाजिक ऐक्याला तडा जाईल, असं वक्तव्य ना इम्तियाज जलील वा अन्य कोणी करू नये.
माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पद्मविभूषण दिल्याबद्दल खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्याला उत्तर देताना गोरे म्हणाले, महाराष्ट्राचे आपमान कोण करत आहे, याच्या सर्टिफिकेटची संजय राऊतकडून आवश्यकता नाही. पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत, तर त्यांचा सन्मान केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणून टीकाच केली पाहिजे, असं नाही. त्यांनी या सर्वांचं स्वागत करायला हवं
सोलापूर - तिरुपती विमानसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत आणि त्यात लवकरच यश येईल, असे सांगताना जयकुमार गोरे यांनी मनोहर भिडे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात मला माहिती नाही, असे सांगून त्याबाबत जास्त बोलणे टाळले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.