K Chandrashekhar Rao  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

KCR Visit To Kolhapur : के. चंद्रशेखर राव करणार इस्लामपुरमध्ये दुपारची न्याहरी ; रघुनाथदादांच्या घरी व्हेज - नॉनव्हेजचा खास 'बेत'

सरकारनामा ब्यूरो

संभाजी थोरात

Islampur : तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष (बीआरएस) महाराष्ट्रमध्ये पाय रोवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. याच धर्तीवर राज्यातील अनेक नेत्यांना के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा देखील समावेश होता.

शेट्टी यांनी ही ऑफर नाकारल्यानंतर आता शेतकरी कामगार संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनाही के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती. मात्र, राव हे उद्या कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर येणार असून या दौर्यात ते रघुनाथदादा पाटील हे बीआरएसला पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता आहे.

राज्यात पक्ष बांधणीसाठी प्रयत्न करत असलेले भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K.Chandrshekhar Rao) उद्या सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापूर, वाटेगाव आणि इस्लामपूर याठिकाणी ते जाणार आहेत. या दौऱ्यात ते या परिसरातील शेतकरी नेत्यांना भेटणार आहेत. मंगळवारी दुपारची न्याहरी ते शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या इस्लामपूर येथील निवासस्थानी करणार आहेत.

के. चंद्रशेखर राव यापूर्वी कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते. कोल्हापूर, सांगली हे दोन्ही जिल्हे ऊस उत्पादनात राज्यात अग्रेसर आहेत. त्यातच यापूर्वी शेतकऱ्यांच्या अनेक चळवळी या भागात झाल्या आहेत. या भागात अनेक लहान मोठ्या शेतकरी संघटना आहेत. त्यामुळे हा दौरा के. चंद्रशेखरराव यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यांना मांसाहार आवडतो.

पंढरपूर दौऱ्यात त्यानी चिकन आणि मटणावर ताव मारला होता. सांगली,कोल्हापूर म्हणजे मांसाहारी खवय्यांचे माहेरघर आहे. उद्या रघुनाथदादा(Raghunath Patil)च्या घरी शाकाहारी आणि मांसाहारी न्याहरीचा बेत आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. चंद्रशेखर राव मटणावर ताव मारणार की सांगलीच्या शेतकऱ्यांची आवडती न्याहरी खर्डा भाकरीला पसंती देणार याची उत्सुकता आहे.

बीआरएस(BRS) पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे उद्या कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी अनेक पक्षप्रवेश होणार असून याचवेळी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील हे बीआरएसला आपला पाठिंबा देखील देणार आहेत. राव हे कोल्हापूर सांगली दौऱ्यावर येणार असून ते यावेळी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत.

तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीला देखील ते अभिवादन करणार आहेत. तिथून ते सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करणार असून याचवेळी रघुनाथदादा पाटील हे त्यांच्यासोबत असतील अशी माहिती आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT