Solapur, 28 April : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत मतदारसंघातून माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेलने तीन जिंकल्या असल्या तरी सहकारी संस्था मतदारसंघातील माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांचा तटबंदी गड भेदणे अशक्य असल्याचे मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात दिसून येत आहे. सोसायटी मतदारसंघातील सर्वच सर्व अकरा जागांवर माने-हसापुरे-कल्याणशेट्टी पॅनेलचे उमेदवार सुमारे २०० मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत मतदारसंघ जिंकलेल्या देशमुखांचा सोसायटी मतदारसंघात चंचूप्रवेश तरी होणार का एवढीच आता उत्सुकता आहे.
सोलापर कृषी उत्पन्न समितीच्या निवडणुकीत भाजपचे नेते एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्या मदतीने पॅनेल उभे केले होते. त्यांना सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, बळीराम साठे, सिद्धराम म्हेत्रे यांनी एकत्र येऊन आव्हान दिले होते.
कल्याणशेट्टी-माने, हसापुरे यांच्या पॅनेलचे सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातील दिलीप माने, सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, श्रीशैल नरोळे, उदय पाटील, प्रथमेश पाटील, नागप्पा बनसोडे, तर सहकार संस्था महिला राखीव गटातून इंदुमती अलगोंडा, अनिता विभूते, सहकार संस्था इतर मागास प्रवर्गातून अविनाश मार्तंडे, सहकार संस्था विमुक्त जाती-भटक्या जमातीमधून सुभाष पाटोळे हे सर्व उमेदवार हे तब्बल २०० मतांनी आघाडीवर आहे.
दरम्यान, सहकारी सोसायटी मतदारसंघातील मतमोजणीच्या पहिल्याच टप्प्यात माने-हसापुरे यांच्या पॅनेलने तब्बल २०० पेक्षा मतांची आघाडी घेतल्यामुळे त्यांच्या ११ जागाही मोठ्या फरकाने जिंकण्याची शक्यता आहे. सोसायटी गटातील माने हसापुरे यांचे वर्चस्व पाहता विरोधी देशमुख गटाला मते मिळविणे अवघड होणार आहे, त्यामुळे ह्या सर्वच जागा माने हसापुरे गटाला मिळणार हे निश्चित आहे.
सोलापूर केंद्रात २०० मते मोजली, त्यातील १८७ माने गटाला, तर देशमुख गटाला अवघी १३ मते मिळाली आहेत. नान्नज केंद्रातील १७५ मोजली असून त्यातील १६९ माने गटाला, तर अवघी ०६ मते देशमुख गटाला पडली आहेत. तिऱ्हे केंद्रातील १२५ मते मोजली आहेत, त्यातील ११५ माने गटाला, तर देशमुख गटाला १० मते पडली आहेत. ही मोजलेली मते दुपारी बारापर्यंतची आहेत. त्यामुळे सोसायटी मतदारसंघातील विजयाच्या बळावर कल्याणशेट्टी-माने-हसापुरे यांची बाजार समितीवर सत्ता येणार हे निश्चित आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.