Kale Zilla Parishad group becomes a prestige battle between BJP and NCP leaders in Karad, as OBC women’s reservation reshapes the traditional political equations. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP Election: भाजपचे अतुल भोसले अन् राष्ट्रवादीचे उंडाळकर गट आमने सामने; ओबीसी- कुणबी आरक्षणामुळे लढत घाम काढणार

Satara ZP Election Political News : काले गटात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपचे अतुल भोसले व राष्ट्रवादीचे ॲड. उदयसिंह उंडाळकर गट आमनेसामने येणार आहेत. ओबीसी- कुणबी आरक्षणामुळे लढतीला नवा रंग मिळालाय.

हेमंत पवार

Satara News : कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणिते ठरवणारा जिल्हा परिषद गट म्हणून काले जिल्हा परिषद गटाची ओळख आहे. दिवंगत ज्येष्ठ नेते भीमराव पाटील यांनी या गटाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व करून वेगळी राजकीय ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनानंतर ही पहिलीच जिल्हा परिषदेची निवडणूक होत आहे. यावेळी त्या गटात आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या रूपाने भाजपने मुसंडी मारली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचाही त्या परिसरात गट सक्रिय आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्यारूपाने काँग्रेसचाही गट आहे. या गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण आहे. त्यामुळे तेथे मूळ ओबीसीऐवजी कुणबी आरक्षणातून दाखले काढणारेही उमेदवारीसाठी असू शकता. त्यामुळे कुणबी विरुद्ध ओबीसी अशी लढत होण्याची शक्यता असून, कुणबी कार्डच्या शक्यतेने ओबीसीत अस्वस्थता दिसून येत आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी, तर पंचायत समिती सभापतिपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. या गटाचे आरक्षणही ओबीसी महिला, तर गटातील कालवडे गणाचे आरक्षण सर्वसाधारण महिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद व सभापतिपद या गटाला खुणावत असल्याने लढत प्रतिष्ठेची होईल, हे नक्की.

कऱ्हाड तालुक्याच्या राजकारणात काले गावची ख्याती आहे. तेथे दिवंगत ज्येष्ठ नेते भीमराव पाटील यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती स्थापनेपासून अपवाद वगळता या गट व गणातून माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर व भीमरावदादांच्या जोडीने वर्चस्व कायम राखले. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भीमरावदादांच्या सून आणि कृष्णा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दयानंद पाटील यांच्या पत्नी मनीषा पाटील या गणातून उंडाळकर यांच्या कऱ्हाड विकास आघाडीतून विजयी झाल्या होत्या.

गटात वाठारचे गणपतराव हुलवान विजयी झाले होते. भिमरावदादांच्या निधनानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असून, त्यांचे पुत्र दयानंद पाटील हे सध्या भाजपचे आमदार डॉ. भोसलेंच्या गटात आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक दयानंद पाटील हे भाजपमधून लढतील, अशी शक्यता आहे.

काले गट नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे, तर काले गणात नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण आहे. आरक्षणाने गोची झालेल्या अनेक मराठा बांधवांना निवडणुकीतून हद्दपार व्हावे लागत होते; परंतु कुणबी प्रमाणपत्रामुळे मराठा समाजातील इच्छुकांना आधार मिळाला आहे.

कुणबी दाखल्यामुळे दयानंद पाटील हे काले गणातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे, तर दुसरीकडे दयानंद पाटील यांच्या सौभाग्यवती मनीषा पाटील या जिल्हा परिषदेसाठी कुणबी दाखल्यावर निवडणूक लढवू शकतात; परंतु गट आणि गणात दाेन्ही जागी ओबीसीऐवजी स्वतः लढणे कितपत योग्य आहे, याचा अंदाज घेऊन दोन्हीपैकी एका ठिकाणी कुणबीचा लाभ घेऊन दिवंगत नेते भीमरावदादांच्या घरातीलच उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यांच्या घरातील उमेदवार नसल्यास वाठार गावात उमेदवार जाऊ शकतो. त्यानुसार भाजपचे जिल्हा ओबीसी संघटनेचे सुनील शिंदे यांच्याही पत्नी निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.

जिल्हा परिषदेसाठी नितीन पाटणकर यांच्या पत्नी किंवा बाजार समितीचे संचालक यांच्या पत्नी निवडणूक लढवू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ॲड. उंडाळकर गटाने तेथे भाजप विरोधात सर्वजण एकत्र करून निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या गट व गणात भाजपच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी ॲड. उंडाळकर यांनी फील्डिंग लावली आहे.

त्यासाठी त्यांनी गावाेगावच्या त्यांच्या गटाच्या नेत्यांना एकमत करून उमेदवार सूचवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे समर्थक आणि काँग्रेस ओबीसी संघटनेचे राज्याध्यक्ष भानुदास माळी हे काँग्रेसचा उमेदवार देणार की घरातच उमेदवारी घेणार? याचीही उत्सुकता आहे.

या गटातील कालवडे गण हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. या गणात ॲड. उंडाळकर यांना मानणारा गट सक्रिय आहे. तेथे भाजपचे दयानंद पाटील हे कोणती भूमिका घेणार? उमेदवार कोण असणार? यावर राजकीय गणिते अवलंबून असतील. त्या गणात आमदार डॉ. भोसले यांनीही सर्वसमावेशक उमेदवार देऊन तो विजय होईल, यासाठी फील्डिंग लावली आहे. या गणात आमदार डॉ. भोसले यांच्या विरोधात ॲड. उंडाळकर यांचा उमेदवार अशीच प्रामुख्याने लढत होईल.

सध्या या गणासाठी बेलवडे बुद्रुक येथील सुप्रिया सचिन ऊर्फ महेश मोहिते, ओंडचे माजी सरपंच मानसिंग थोरात यांच्या पत्नी, विजयसिंह ऊर्फ बबलू थोरात यांच्या पत्नी किंवा भावजय स्वाती थोरात, तर कालवडे येथील माजी सदस्या ललिता थोरात या निवडणुकीत उतरू शकतात, तर भाजपकडून दयानंद पाटील यांच्या गटातून ओंडचे उद्योजक राजेंद्र थोरात यांच्या पत्नी, सोसायटीचे माजी अध्यक्ष सर्जेराव थोरात यांच्या पत्नी किंवा सून इच्छुक आहेत. बेलवडे बुद्रुक येथील भगवान मोहिते यांच्या पत्नी सुजाता मोहिते निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. कालवडे किंवा कासारशिरंबे येथूनही ऐनवेळी एखाद्याला उमेदवारी देऊन त्यालाही निवडणूक रिंगणात उतरू शकतात.

काँग्रेस ठरणार निर्णायक

काले गटात माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचा गट कार्यरत आहेत. त्यांचे समर्थक काँग्रेसच्या ओबीसी सेलचे राज्य प्रमुख भानुदास माळी हे ही त्या गटात येतात. ॲड. उंडाळकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने त्यांना मानणारा काँग्रेसचा मतदार हा त्यांच्यासोबत गेला आहे. मात्र, अजूनही काँग्रेसचे मतदार हे त्या गटात आहेत. त्या गटात काँग्रेसच्या मतांची संख्या कमी असली, तरी ते मतदार निर्णायक ठरू शकतात, अशी स्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT