Satara ZP Result News : सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती निवडणूक निकालातून मतदारांनी भाजपला स्वीकारल्याचे स्पष्ट झाले. कराड तालुक्यात पहिल्यांदाच भाजपने 12 पैकी 8 गटांत, तर पंचायत समितीच्या 24 पैकी 13 गणांत स्पष्ट बहुमत मिळवले. या निकालातून कराड दक्षिणमध्ये आमदार अतुल भोसले, तर उत्तरमध्ये आमदार मनोज घोरपडे यांनी त्यांची पकड घट्ट असल्याचे दाखवून दिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसने वारुंजी गटाबरोबरच तळबीड व वारुंजी गणात विजय मिळवत वादळात दिवा लावल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना कऱ्हाड उत्तरेत अपयश आले. कोपर्डे हवेली, पाल, उंब्रज गण वगळता उत्तेरतील चार गट व अन्य गणात यश आले नाही. पाल, मसूर गटात पारंपरिक उमेदवारांनाच दिलेली संधी जनतेच्या पचनी पडली नसल्याचे दिसून येते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी येळगाव व कार्वे गटासह चार गणांत विजय मिळाला. मात्र, या निकालाने दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.
सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती निवडणुकीत कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले आणि कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पहिल्यांदाच मिळवलेल्या या यशामागे संघटनबांधणी, बुथस्तरीय नियोजन आणि कार्यकर्त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क हे प्रमुख घटक ठरले आहेत. गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात पक्षाने वाढवलेला जनसंपर्क आणि स्थानिक प्रश्नांवर घेतलेल्या भूमिकेचा थेट परिणाम निकालात दिसून आला.
आमदार डॉ. भोसले यांनी उमेदवार देताना घेतलेली जबाबदारी आणि आमदार घोरपडे यांनी वर्षभरापासून केलेली मोर्चेबांधणी त्यांच्या पथ्यावर पडली. मात्र, हा निकाल राष्ट्रवादीसाठी आत्मपरीक्षणाचा इशारा ठरला आहे. कराड उत्तरेत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना पारंपरिक चेहऱ्यांवरच भर दिल्यामुळे अपेक्षित यश मिळवता आले नाही. पाल, उंब्रज, मसूर या गटातील त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांचा पराभव हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या माजी मंत्री पाटील यांना एकाही जिल्हा परिषद गटात विजय मिळवता न येणे, तसेच पंचायत समितीत केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागणे, हे आत्मचिंतन करायला लावणारे आहे. संघटनेतील मर्यादा आणि बदलत्या मतदारवृत्तीच्या द्योतकामुळेच पाटील यांना अपयशाला सामोरे जावे लागले आहे. नव्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज आणि स्थानिक पातळीवर नव्याने उभारी घेण्याची आवश्यकता या निकालातून अधोरेखित झाली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते ॲड. उंडाळकर यांनाही मर्यादित यश मिळाले. जिल्हा परिषदेतील येळगाव आणि कार्वे या दोन गटांत, तसेच पंचायत समितीच्या कालवडे, येळगाव, सवादे व कार्वे जागांवर विजय मिळाला. मात्र, पूर्वीच्या तुलनेत प्रभाव कमी झाल्याचे स्पष्ट दिसते. पूर्वी कऱ्हाड दक्षिण हा उंडाळकरांचा बालेकिल्ला होता. सध्या तो राहिला नसल्याचे दिसून येते. त्यांना नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्यात आलेले अपयश हे या निकालातून समोर आले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीसाठी संघटन मजबूत करणे, नव्या चेहऱ्यांना संधी देणे आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमकपणे काम करणे, ही काळाची गरज ठरली आहे.
या निवडणुकीने भाजपला स्पष्ट राजकीय बळ दिले असले, तरी इतर पक्षांसाठीही हा पुनर्रचना आणि आत्मचिंतनाचा टप्पा ठरणार आहे. तालुक्यातील राजकारण आता व्यक्तीप्रतिमेपेक्षा कामगिरी, जनसंपर्क आणि जमिनीवरील उपस्थिती यावर अधिक अवलंबून राहणार असल्याचे या निकालाने अधोरेखित केले. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या नेत्यांना गावपातळीवर सक्रिय राहून मतदारांचा विश्वास संपादन करणे आवश्यक ठरणार आहे. कऱ्हाडच्या मतदारांनी दिलेला हा कौल म्हणजे बदलत्या राजकारणाचा स्पष्ट संदेशच मानला जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने मर्यादित यश मिळवले. प्रतिकूल परिस्थितीतही काही ठिकाणी प्रभाव टिकवून ठेवला आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसने वारुंजी गटासह वारुंजी व तळबीड गणात विजय मिळवला. वैयक्तिक प्रतिमा, स्थानिक संपर्क आणि विश्वासार्ह नेतृत्व यामुळे काही भागांत मतदारांनी काँग्रेसचा ‘हात’ पकडून ठेवल्याचे निकालातून स्पष्ट होते. मात्र, एकेकाळी तालुक्यावर वर्चस्व असणारा काँग्रेस आता केवळ एका गटापुरताच उरल्याचे दिसून आले.
कऱ्हाड उत्तरेतील कोपर्डे हवेली गटात भाजप, राष्ट्रवादी व अपक्ष अशी तिरंगी लढत झाली. त्यात भाजपचे आमदार घोरपडे यांनी भाजपचे नेते रामकृष्ण वेताळ यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांच्या ताकदीवर अपक्ष लढण्याचा निर्धार केला. त्यांनी दोन-तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेसाठी तयारी केली होती. त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि सामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्याची हातोटीच त्यांना विजयापर्यंत घेऊन गेली. तेथे त्यांच्या पत्नी विद्या वेताळ निवडून आल्या. भाजपने उमेदवारी नाकारूनही वेताळ यांनी मिळवलेला विजय पक्षाच्या नेत्यांना आत्मचिंतनच करायला लावणार ठरला.
साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या तांबवे गटात शिवसेनेच्या विक्रम पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याने त्यांना या गटात धक्का बसला. तेथे भाजपचे उमेदवार धनंजय ताटे यांचा विजय झाला. काँग्रेसचे जगदीश पाटील हे तिसऱ्या क्रमांकवर गेले. मंत्री देसाईंचा कऱ्हाड तालुक्यातील बालेकिल्ला असलेल्या तांबवे गटात बसलेला धक्का हा या मतदारसंघातील बदलत्या राजकीय प्रवाहाचा संकेत मानला जात आहे. यामुळे स्थानिक पातळीवरील नाराजीही त्यांना भोवली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.