

Karad, 24 January : सातारा जिल्हा परिषद, कऱ्हाड पंचायत समिती निवडणुकीनिमित्त कऱ्हाड (जि. सातारा) तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. त्याला शह देण्यासाठी शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचे चक्रव्यूह भेदण्यासाठी भाजपनेही जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, कऱ्हाड दक्षिणमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी व काँग्रेस, तर कऱ्हाड उत्तरेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांतच प्रमुख लढती होणार आहेत. मात्र, पक्षासाठी काम करूनही एबी फॉर्म न दिल्याने दिग्गजांनी आता बंडाची तयारी केल्याचे दिसून येते.
कऱ्हाड (Karad) पंचायत समितीवर गेली अनेक वर्षे माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर गटाचे वर्चस्व राहिले आहे. गेल्या वेळच्या निवडणुकीत उंडाळकर गटासाेबत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे सूत जुळल्याने पंचायत समितीची सत्ता ताब्यात ठेवली होती. त्यावेळी डॉ. अतुल भोसलेंच्या सदस्यांना विरोधी बाकावर बसावे लागले होते.
सातारा (Satara) जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवेळी उमेदवारीवरून माजी मंत्री पाटील व ॲड. उंडाळकर यांच्यात दुरावा आला. मात्र, जिल्हा बॅंकेच्या निमित्ताने यापूर्वी विरोधात असणारे बाळासाहेब पाटील व डाॅ. भोसले एकत्र आले. त्यानंतर झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीतही तेच समीकरण राहिले.
त्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री चव्हाण हे उंडाळकरांसाठी मैदानात उतरले, तसेच उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांनीही ॲड. उंडाळकरांना साथ दिली. सर्वांच्या सहकार्याने बाजार समितीत उंडाळकरांची सत्ता आली.
बाजार समितीमधील सत्तेनंतर ॲड. उंडाळकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला, तर सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत आमदार घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ उतरूनही माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कारखान्याची सत्ता ताब्यात ठेवली. त्यामुळे त्यांचाही गटही चार्ज झाला.
नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत माजी मंत्री पाटील यांच्या गटाने भाजपशी फारकत घेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजेंद्रसिंह यादव यांच्याशी जुळवून घेत पालिकेची सत्ता मिळवली. त्यामुळे तालुक्यातही त्या समीकरणाचे पडसाद जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमटणार आहेत.
कऱ्हाड तालुक्यात सध्या सर्वच नेत्यांचे गट सक्रिय आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीवर वर्चस्वासाठी सर्वच नेत्यांनी ताकद लावली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या भाजपने स्वबळावर लढविण्याची तयारी केली आहे. त्यामुळे भाजपला घेरण्यासाठी शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. निवडून येणाराच उमेदवार असावा, या अटीवर नेत्यांनी सध्या तगड्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.
कोपर्डे हवेली, तांबवे, कार्वे, मसूर यासह अन्य गट-गणातील दिग्गज उमेदवारांना एबी फॉर्मच न दिल्याने त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. ते टाळण्यासाठी नेत्यांनी आता फील्डिंग लावण्याची तयारी केली आहे. पंचायत समितीवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावा, यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यात कोण बाजी मारणार? याकडे लक्ष लागून आहे.
मातब्बरांची पुन्हा एन्ट्री शक्य
कऱ्हाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १२ गटांपैकी पाल, उंब्रज, मसूर, तांबवे, येळगाव हे गट खुले आहेत. त्यात येळगाव गटातून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, पाल गटातून जिल्हा परिषदेचे माजी अर्थ सभापती देवराज पाटील, तर मसूर गटातून माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे या मातब्बरांची पुन्हा झेडपीत एन्ट्री होऊ शकते.
कऱ्हाड दक्षिणला झेडपी अध्यक्षपदाची संधी?
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदाचे आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. तालुक्यातील विंग, काले या गटातही ओबीसी महिला आरक्षण आहे. दोन्ही गट कऱ्हाड दक्षिणेत असून, त्या गटावर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले यांचे उमेदवार आहेत. त्यामुळे त्या गटातून निवडून येणारी महिला ही अध्यक्षपदाची दावेदार असू शकते. त्यासाठीही भाजपने फील्डिंग लावली आहे.
कऱ्हाड तालुका
मागील पक्षीय बलाबल
जिल्हा परिषद सदस्य
राष्ट्रवादी काँग्रेस : तीन
कऱ्हाड विकास आघाडी (उंडाळकर गट) : तीन
भाजप : तीन
काँग्रेस ः तीन
पंचायत समिती :
राष्ट्रवादी : सात
कऱ्हाड विकास आघाडी (उंडाळकर गट) : सात
भाजप : सहा
काँग्रेस ः चार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.