Indapur, 05 November : इंदापूर तालुक्यातील महात्मा फुले नगर-बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 21 संचालक पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीतील राजकीय संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री तथा कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांना कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यात सलग दुसऱ्यांदा यश आलं आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय समन्वयातून चित्र बदलले. कारखान्याच्या २१ जागांसाठी २१ अर्ज शिल्लक राहिल्याने २१ संचालकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. या नूतन संचालक मंडळात विद्यमान अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे सुपुत्र राजवर्धन पाटील यांचा समावेश आहे.
कारखाना सध्या ओंकार ग्रुपकडे सहयोगी तत्वावर चालवण्यासाठी देण्यात आला आहे. आर्थिक अडचणी, कारखान्यापुढील आव्हाने, बदलती राजकीय समीकरणे आणि सध्याची दुष्काळ स्थिती अशा पार्श्वभूमीवर बिनविरोध झालेली ही निवडणूक इंदापूरच्या सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय ठरली आहे.
कर्मयोगी कारखान्याचे बिनविरोध निवडलेले संचालक पुढीलप्रमाणे : माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, राजवर्धन हर्षवर्धन पाटील, राकेश रमेशप्रसाद शुक्ला, रवींद्र वामन सरडे, शांतीलाल दत्तात्राय शिदे, छगन धोंडिबा भोंगळे, नीलेश शामराव देवकर, राजेंद्रकुमार प्रतापराव देवकर, संतोष लक्ष्मण काळे, श्रीकांत खिंवराव देवकर, विजय विठ्ठल खर्चे, पराग रमेशराव जाधव, रणजित नामदेव निकम, रोहित राजेंद्र गायकवाड, बिभिषण कल्याण नलवडे, अतुल शिवाजी शिगाडे, वसंत खंडू मोहोळकर, हरिश्चंद्र सदाशिव पारेकर, रत्नमाला संपत पवार, सुमन नारायण व्यवहारे, अमोल सुभाष जाधव.
दरम्यान, या बिनविरोध निवडीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार पार्थ पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, भाजप नेते प्रदीप गारटकर, प्रवीण माने आदी सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सभासदांचे सहकार्य लाभले. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या सर्वांनी घेतलेल्या सहकार्याच्या भूमिकेबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे या दोन गटांत झालेल्या समेटामुळे तालुक्यातील राजकीय संघर्षाची धार कमी झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री (स्व) अजित पवार यांच्या उपस्थितीत या दोन्ही गटाने एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. त्यातून त्यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका एकत्रितपणे लढल्या होत्या, त्यामुळे कर्मयोगी कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार, याची चर्चा तालुक्यात होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.