BJP has nominated Kaustubh Gawade for the Pune Teachers Constituency Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pune Teachers Constituency: पुणे शिक्षकसाठी भाजपचा मास्टरस्ट्रोक? कौस्तुभ गावडेंचा ८ हजार शिक्षकांचा थेट कनेक्ट ठरणार गेमचेंजर?

BJP has nominated Kaustubh Gawade for the Pune Teachers Constituency: भाजपने पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडेंना उमेदवारी दिली. शिक्षण क्षेत्रातील अनुभव, शिक्षकांशी संपर्क आणि संघटनात्मक पार्श्वभूमीच्या जोरावर गावडेंसमोर आता विधानपरिषद निवडणुकीचे आव्हान आहे.

Rahul Gadkar

Pune Teachers Constituency News: विधानपरिषदेचा पुणे शिक्षक मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जाणार, यावर गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्येच जोरदार रस्सीखेच सुरू होती. शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांच्या नावाची चर्चा होती. मंत्री उदय सामंत यांचे ओएसडी सचिन सानप हेही उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. पण शिवसेनेच्या या दोन्ही इच्छुकांचा पत्ता कट झाला असून ही जागा भाजपच्या वाट्याला गेली आहे. भाजपने अपेक्षेप्रमाणे कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी पुणे शिक्षक मतदासंघ भाजपकडे घेण्यासाठी कमालीचे प्रयत्न केले होते. याशिवाय पाटील आणि बावनकुळे यांना दोन्ही मंत्र्यांनी गावडे यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह धरला होता.

कौस्तुभ गावडे आहेत तरी कोण?

मागील काही वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात काम करणारा चेहरा म्हणून कौस्तुभ गावडे यांची ओळख आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी १९५४ मध्ये स्थापन केलेल्या श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रवास सुरु आहे. या संस्थेच्या माध्यमातून शिक्षक आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गावडे सध्या कार्यरत आहे. या दरम्यान, गावडे यांनी शिक्षक, प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक आणि शैक्षणिक प्रशासन यांच्यासोबत काम केले आहे. म्हणजेच त्यांची राजकीय ओळख निर्माण होण्यापूर्वी त्यांचा मुख्य कार्यक्षेत्राचा केंद्रबिंदू शिक्षण व्यवस्था राहिला आहे.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या संस्थेचा विस्तार आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांपर्यंत झाला आहे. महाराष्ट्रात १२ आणि कर्नाटकातील १ अशा एकूण १३ जिल्ह्यात संस्थेच्या ४१२ हून अधिक शाखा कार्यरत आहेत. या माध्यमातून लाखो विद्यार्थी या शैक्षणिक प्रवाहात आहेत. सोबत सुमारे ११ हजार शिक्षक आणि ३,२०० हून अधिक शिक्षकेतर कर्मचारी या शैक्षणिक संस्थेचा परिवार आहे. यातही पुणे विभागात माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि वरिष्ठ महाविद्यालय स्तरावर ८,००० पेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहेत. म्हणजे प्रचारात उतरण्यापूर्वीच गावडे ८ हजार मतदारांशी थेटपणे जोडलेले आहेत. हा आकडाच गावडे यांच्या उमेदवारीसाठी सर्वात मोठा प्लस पॉईंट ठरला.

पण पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही कधीच फक्त फिक्स व्होट बँकेवर अलंबून नसते. या मतदारसंघात शिक्षकांचे प्रश्न, सेवा अटी, पेन्शन, अनुदान, भरती आणि शैक्षणिक धोरणे हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात. कौस्तुभ गावडे यांनीही शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर भूमिका घेतल्याचे त्यांच्या प्रचारातील माहितीतून समोर येते. जुनी पेन्शन योजना, संचमान्यता, टप्पा अनुदान, पवित्र पोर्टलवरील भरती, TETची सक्ती, शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा वाढता भार आणि तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे प्रश्न यांसारख्या मुद्द्यांचा त्यांच्या कामात उल्लेख केला जातो. शिक्षकांच्या प्रश्नांवर आंदोलनांमध्ये सहभागी होण्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे.

ऑगस्टमध्ये महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने म्हणजेच TDFने त्यांना पुणे विभाग शिक्षक मतदारसंघासाठी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले होते. त्यावेळी शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव हे उमेदवारीसाठीचे निकष असल्याचे सांगण्यात आले होते. कौस्तुभ गावडे यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे एका बाजूला शिक्षण क्षेत्रातील त्यांचा अनुभव आहे, तर दुसऱ्या बाजूला आता भाजपचा अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्यासमोर मोठी राजकीय जबाबदारी आली आहे.

शिक्षकांचा आमदार म्हणून गावडेंपुढे आव्हान काय?

आता खरी परीक्षा सुरू होते ती शिक्षक मतदारांच्या प्रश्नांवर. जुनी पेन्शन योजना असो, TETचा मुद्दा असो, संचमान्यतेचे निकष असोत किंवा शिक्षकांच्या सेवाशर्ती आणि अनुदानाचे प्रश्न असो, हे प्रश्न वर्षानुवर्षे चर्चेत आहेत. त्यामुळे निवडणुकीत केवळ शिक्षण क्षेत्रातील अनुभव पुरेसा ठरणार नाही. शिक्षकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका काय? शासनाकडे प्रश्न कसे मांडणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक मतदारांना दिलेली आश्वासने प्रत्यक्षात आणण्यासाठी काय रोडमॅप असणार? यावर गावडे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

या निवडणुकीत भाजपकडून कौस्तुभ गावडे मैदानात आहेत, तर काँग्रेसने विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे महायुतीतील काही इच्छुक स्वतंत्रपणे मैदानात उतरण्याची शक्यता असल्याने निवडणुकीतील समीकरणे आणखी बदलू शकतात. पुणे शिक्षक मतदारसंघात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यामुळे या मतदारसंघाचा विस्तार मोठा आहे आणि शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला संघटनात्मक ताकद पणाला लावावी लागणार आहे.

मतदान २३ ऑक्टोबरला होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे. त्यानंतर अर्जांची छाननी आणि माघारीनंतर अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होईल. एकूणच शिक्षण क्षेत्रातून विधानपरिषदेच्या राजकारणात आलेले कौस्तुभ गावडे शिक्षक मतदारांचा विश्वास किती मिळवतात, हे २३ ऑक्टोबरच्या मतदानातून स्पष्ट होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT