Solapur News : जुने हेवेदावे बाजूला ठेवून तीनही पक्षांनी महायुतीच्या विजयासाठी वज्रमूठ बांधण्यासाठीचा हा मेळावा आहे. केवळ खुर्ची, बॅनरवरील फोटोसाठी भांडत बसू नका. आगामी सर्वच निवडणुकीत महायुतीची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या मेळाव्यात केले. (Keep Disagreement aside for the victory of Mahayuti : Chandrakant Patil)
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. १४ जानेवारी) सोलापुरात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यास भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही आपापसांतील मतभेद बाजूला ठेवून मोदी पुन्हा सत्तेवर येण्यासाठी परिश्रम घ्या.
माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशाचा संदर्भ देऊन मंत्री चंद्रकांतदादा म्हणाले की, आज काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या विकासाच्या कामावर विश्वास ठेवून भाजपसोबत येत आहेत.
नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्ते एकत्र आले आहेत. आपली अर्थव्यवस्था केवळ मोदींच्या नेतृत्वकौशल्यामुळे जगात पाचव्या क्रमांकावर आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत यंदा ४५ नव्हे तर ४८ जागा जिंकण्यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले.
राज्याच्या विकासासाठी नातं बाजूला ठेवून महायुतीमध्ये सामील होण्याचा महत्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. अजितदादांनी नात्यापेक्षा विकासाला महत्व दिले आहे. त्यामुळेच आम्ही आज त्यांच्यासोबत आहोत, असे माजी आमदार राजन पाटील यांनी स्पष्ट केले.
आगामी काळात आपण तीनही पक्ष मागील मतभेद, वाद विसरून एकदिलाने काम करुयात. लोकसभा निवडणुकीत आपण महायुतीची ताकद दाखवून देऊन आणि ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात येईल, असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
मेळाव्याला खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार बबनराव शिंदे, आमदार राजेंद्र राऊत, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे , शहाजी पवार, राजाभाऊ इंगळे, संतोष पवार आदींसह महायुतीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.