Anil Babar, Gopichand Padalkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Khanapur Politics : राज्यात महायुती आणि मतदारसंघात कटकारस्थान-कुरघोडी? शिंदेंच्या आमदाराला घेरलं!

सरकारनामा ब्यूरो

विद्याधर कुलकर्णी -

Khanapur-Aatpadi VidhanSabha Constituency :

राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात असून त्यामध्ये भाजप-शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी सत्तेची वाटणी झालेली आहे. त्यानुसार राज्याचा विकास करण्याची भूमिका या महायुतीने घेतलेली आहे. राज्यात वरील स्तरावर महायुतीत समन्वय असल्याचे दिसून येत आहे. मात्र खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये या महायुतीतच कुरघोडी सुरू असल्याचे मतदारांच्या लक्षात येत आहे.

मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर हे प्रतिनिधित्व करतात. त्याचप्रमाणे भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी नेते म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे असे आणि मुलूखमैदानी तोफ म्हणून प्रसिद्ध असणारे गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली गेली आहे.

राष्ट्रवादी Ajit Pawar गटातून माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदावर आरुढ करून त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी केला आहे. तरीही मतदारसंघांमध्ये या तिन्ही नेत्यांमध्ये समन्वय वा एकी दिसून येत नाही. प्रत्येकजण संधी मिळेल तेव्हा कुरघोडी आणि कटकारस्थाने करून एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यग्र असल्याचे दिसत आहे.

आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर हे दोन्ही नेते या मतदारसंघांमध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करू लागले आहेत. यंदा आटपाडीचाच आमदार करण्याचा जणू त्यांनी चंगच बांधला आहे. आपल्या निधीतून मतदारसंघामध्ये विधायक काम करीत असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या वेगवेगळ्या योजना लोकांमध्ये घेऊन जात आहेत. भाजपतील विविध पदे त्यांनी या मतदारसंघांमध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणी यांना वाटण्यास सुरुवात केली आहे. त्यामधून ते आपले वजन वाढवत आहेत आणि येणाऱ्या विधानसभेसाठी आपला पाया भक्कम करीत आहेत.

मतदारसंघाचे सध्याचे आमदार यांचे यातून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचवेळी नुकतेच दोन-तीन महिन्यांपूर्वी अजित पवार गटामध्ये दाखल झालेले स्वच्छ विटा गावाचे ब्रँड अँबेसिडर व माजी नगराध्यक्ष हेसुद्धा आमदारांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाहीत. त्यांना ग्रामीण जिल्हाध्यक्षपद देऊन ताकद देण्यासाठी अजितदादा पवार यांनी हे पद देऊ केले आहे. त्यातूनच त्यांनी संपूर्ण सांगली जिल्हा ढवळून काढून राष्ट्रवादी अजितदादा गट बळकट करण्याचा चंग बांधला आहे.

मतदारसंघांमध्ये अजितदादांच्या माध्यमातून निधी व वेगवेगळे शासकीय कार्यक्रम, योजना आणि उर्वरित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. येणाऱ्या विधानसभेसाठी मी तयार असल्याचे विरोधकांना दाखवून देत आहेत. जिथे संधी मिळेल तिथे वैभव पाटील हे आमदार बाबर यांच्यावर टीकाटिप्पणी करण्याची संधी सोडत नाहीत. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी आमदार बाबर प्रयत्न करीत असतानासुद्धा त्यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी वैभवदादा पाटील हे स्वतः खानापूर येथे जाऊन उपकेंद्राची जागेची पाहणी करून त्याची शासकीय मान्यता प्राप्त झाल्याचे सांगून आपले महत्त्व वाढवत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

असे असले तरीसुद्धा आमदार अनिल बाबर हे मात्र आपल्या कामांमध्ये व मतदारसंघाच्या विकासामध्ये व्यग्र आहेत. या दोन्हीही नेत्यांकडून सुरू असणाऱ्या टीकाटिप्पणी, कटकारस्थान आणि कुरघोडींकडे ते अजिबात लक्ष देत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत जवळच्या सहकाऱ्यांमध्ये आमदार अनिल बाबर यांचे स्थान आहे. त्यातूनच मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणून त्याचा लाभ संपूर्ण खानापूर-आटपाडी व विसापूर सर्कल या भागाला मिळवून देत आहेत. दुष्काळी भागाची जीवनवाहिनी म्हणून टेंभू योजनेकडे पाहिले जाते. ती योजना पूर्ण करणे आणि त्याचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच अंतिम ध्येय असल्याचे आमदार अनिल बाबर सर्व ठिकाणी सांगत असतात.

आमदार अनिल बाबर हे आपल्या कामातून ओळखले जातात. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांना मानणारा मोठा गट मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये आहे. त्यांच्याजवळ कोणताही व्यक्ती अथवा विरोधक एखादे काम घेऊन गेल्यानंतर ते काम होणार किंवा नाही, याची खात्री लगेच होऊन जाते. अशी त्यांची कामाची पद्धत आहे. त्यामुळेच आजवर ते आपला प्रभाव संपूर्ण मतदारसंघांमध्ये पाडत असतात.

राज्यात महायुती सरकार असले तरी मतदारसंघात मात्र एकमेकांविरुद्ध कटकारस्थान, कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे सर्व मतदारांना पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात या मतदारसंघामध्ये महायुतीचे अस्तित्व राहणार की महायुती उद्ध्वस्त होणार, हे येणारा काळच ठरविणार आहे. जनता मात्र काम करणाऱ्या नेत्याच्या मागे उभी असते, हा इतिहास आहे. त्यामुळेच या सर्वांनी आपल्या कामांना महत्त्व देऊन ते पूर्णत्वास नेण्याची भूमिका बजावत आहेत. मतदारराजा कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

edited by sachin fulpagare

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT