Bazar Samiti Sabhapati Election
Bazar Samiti Sabhapati Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Paranda Bazar Samiti : ‘आमच्या बाजूने मतदान करा; नाहीतर जिवंत सोडणार नाही’; महाविकास आघाडीच्या संचालकांचे अपहरण

सरकारनामा ब्यूरो

टेंभुर्णी (जि. सोलापूर) : परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या वेळी आमच्या बाजूने मतदान कर, असे म्हणत महविकास आघाडीच्या १० संचालकांसह बारा जणांना ३० ते ३५ जणांनी लाकडी दांडके, कुकरी आणि लोखंडी गजाने मारहाण केली. तसेच, रोख तीन लाख रुपये आणि २० हजारांचा मोबाईल हिसकावून पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांचे अपहरण करण्यात आले. ही थरारक घटना भीमानगर (ता. माढा) येथील विश्रामगृहावर घडली. (Kidnapping of director of Mahavikas Aghadi in Paranda Bazar Samiti)

दरम्यान, संचालकांचे अपहरण करण्यात आल्याने परंडा बाजार समितीच्या (Bazar Samiti) सभापती (Sabhapati) आणि उपसभापती निवडीची बैठक रद्द करण्यात आली आहे. ती बैठक आता येत्या शुक्रवारी (ता. २६ मे) होणार आहे. दरम्यान, या प्रकरणी टेंभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात महाविकास आघाडीचे १३ सदस्य निवडून आले आहेत. सभापती व उपसभापतीची निवड बुधवारी होती. राजकीय पक्षाचा अथवा राजकीय व्यक्तीचा दबाव येऊ नये, यासाठी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) परंडा बाजार समितीचे संचालक हे भीमानगर येथे आले होते. त्याच ठिकाणाहून ही घटना घडली आहे.

परंडा बाजार समितीमधील जयकुमार जीवराज जैन (रा. कपिलापुरी, ता परंडा, जि. उस्मानाबाद) यांच्यासह निवडून आलेले सुजित भारत देवकते (रा. वडनेर), रवींद्र बबनराव जगताप (रा. इनगोंदा), संजय लक्ष्मण पवार (रा. शिरसाट), दादा जालिंदर घोगरे (रा. डोणजे), सोमनाथ लक्ष्मण शिरसाट (रा. डोणजे), शंकर धोंडीराम जाधव (रा. दुधी), हरी संतराम नलवडे (रा. कुंभेजा), हरिश्चंद्र नामदेव मिस्कील (रा. डोणगाव), किरण भारत शिंदे (रा. डोणगाव), सुदाम चांगदेव देशमुख (रा. खासापुरी), शरद श्रीहरी झोंबाडे (रा. परंडा) असे सर्वजण रविवारी (ता. २१) भीमानगर (ता. माढा) येथील विश्रामगृहावर थांबले होते.

शासकीय विश्रामगृहात सकाळी सातच्या सुमारास आंघोळ व इतर कामे करीत असताना अचानक बाथरूमच्या खिडकीच्या काचा फोडून व दरवाजामधून सुरेश ऊर्फ सूर्यकांत कांबळे (रा. वरुड), गणेश जगदाळे (रा. खासगाव), प्रदीप आजिनाथ पाटोळे (रा. कवडगाव), प्रशांत शिंदे (रा. साकत), समाधान मिस्कीन (रा. डोणगाव), किरण ऊर्फ लादेन भीमा बरकडे (रा. मुरूडवाडी), जगदीश ठवरे (रा. कवडगाव) व इतर ३० ते ३५ अज्ञातांनी ‘चल गाडीत बस, तुला मस्ती आली आहे, सभापती व उपसभापती निवडीवेळी आमच्या बाजूने मतदान कर’ असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण करू लागले.

गणेश जगदाळे याने लोखंडी कुकरीने जैन यांना मारून जखमी केले. दंडावर व हातावरही मारहाण केली. शासकीय विश्रामगृहाचे नुकसान केले, तसेच, हातातील मोबाईल व बॅगेतील तीन लाख रुपये रोख जगदाळे याने घेऊन त्यांनी सोबत आणलेल्या गाड्यांत जैन व इतर सदस्यांना बळजबरीने बसविले. परिते येथे एका गाडीतून (एमएच १२/ क्यूजी, ५५५५) पंढरपूर, सांगोला मार्गे मिरज तालुक्यातील कवठे एकंद या गावच्या शिवारात नेऊन सोडले.

‘तुम्हाला आता जिवंत सोडत आहोत. तुम्ही जर पोलिस ठाण्यात आमच्या विरोधात तक्रार दिली, तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही. तुमच्या बरोबर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनाही जिवंत सोडणार नाही’ म्हणून पिस्तुलाचा धाक दाखविला व ते सर्वजण निघून गेले. नंतर गाडी भाड्याने करून सर्व सदस्य टेंभुर्णी येथे आले.

याप्रकरणी जयकुमार जैन (रा कपिलापुरी, ता. परंडा यांनी) टेंभुर्णी पोलिसांत फिर्याद दिली असून, टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT