Hasan Mushrif, Chandrashekhar Bawankule Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur BJP Politics : पालकमंत्री अन् कार्यकारिणीवरून भाजपत वाद; कोल्हापुरात नेमकं काय चाललंय?

Sunil Balasaheb Dhumal

राहुल गडकर

Kolhapur Political News : कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीवरून आधीच भाजपत असंतोष होता. आता पालकमंत्र्यांवरून नाराजी निर्माण झाली आहे. कोल्हापूर भाजपने माजी खासदार किरीट सोमय्यांना साथ देत मंत्री हसन मुश्रीफांविरोधात रान उठवले होते. आता तेच पालकमंत्री झाल्याने भाजप पदाधिकाऱ्यांची गोची झाली आहे. तसेच जिल्हा कार्यकर्त्यांतील वादही चव्हाट्यावर आला आहे. (Latest Political News)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोल्हापूर ७ ऑक्टोबरला जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा भाजपमधील वाद आणखी गडद होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यासह शहरातील नवा निष्ठावंत विरुद्ध उपरा असा वाद चांगलाच उफाळून आला आहे. नव्याने जाहीर केलेली जिल्हा कार्यकारिणी रद्द करा, मगच जिल्हा दौऱ्यावर या असा इशारा कार्यकर्त्यांनी थेट प्रदेशाध्यक्षांना दिला आहे. त्यामुळे या दोन्ही मुद्द्यांवर बावनकुळे काय मार्ग काढणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

पालकमंत्रिपदाच्या विस्तारात उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरचे पालकमंत्रिपद मिळेल, अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची आशा होती. या आशेवर पाणी फिरून पालकमंत्रिपदाची धुरा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोपवली. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आतापासूनच नाराजी दिसत आहे. मंत्री पाटील यांचे पुन्हा कोल्हापुरात पुनर्वसन होण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठींवर दबाव वाढवला होता; पण त्याला यश आले नाही. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याबरोबर भाजपचे कार्यकर्ते हसन मुश्रीफ यांच्या विरोधात होते. त्यामुळे कार्यकर्त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर झालेली आहे. (Maharashtra Political News)

दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यासह भाजपअंतर्गत वाद मिटण्याचे नाव घेत नाही. कोल्हापूर जिल्ह्यात आजरा, गडहिंग्लज आणि शिरोळ तालुक्यांत भाजपमध्ये नवा आणि जुना असा कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. जिल्ह्यातील हा वाद पक्षश्रेष्ठी यांच्या कानावर गेला आहे. भाजप जिल्हाअंतर्गत वाद हा जिल्ह्यातच मिटवण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी प्रयत्न केले. मात्र, या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही.

कोल्हापुरातही जुना नवा पदाधिकारी वाद उफाळून आला आहे. भाजपमधील नवे पदाधिकारी मनमानी कारभार करून जुन्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नव्या पदाधिकाऱ्यांविरोधात व्हॉट्सअॅपवर अत्यंत खालच्या भाषेत मॅसेज व्हायरल केले आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी थेट मंत्र्यांपर्यंत कुरघोड्या करणे सुरू ठेवल्याने त्याचा रोष भाजप कार्यकर्त्यांमध्ये आहे.

ठराविक दोन पदाधिकाऱ्यांविरोधात रोष व्यक्त होत असून, त्यांच्याबाबत अनेक तक्रारी जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांच्याकडे जात आहेत. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन कसे करणार? का कार्यकर्त्यांची कान उघाडणी करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT