Kolhapur News : महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ पुनर्रचना या दोन विधेयकांमुळे यंदाचे अधिवेशन गाजणार आहे. अनेक वर्षे मतदारसंघ बांधून ठेवलेल्या नेत्यांना या निमित्ताने धक्का बसणार आहे. त्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही त्याचे राजकीय परिणाम होणार आहेत. ही विधेयके मंजूर करण्यासाठी पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या या विधेयकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वीही कोल्हापूर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ होते. 2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये गडहिंग्लज आणि सांगरूळ मतदारसंघ विलीन करून 10 मतदारसंघ करण्यात आले. वाढलेल्या लोकसंख्येनुसार नव्या मतदारसंघांची निर्मिती होऊ शकते. त्यामुळे कोल्हापुरात पुन्हा 12 किंवा 13 विधानसभा मतदारसंघ आणि दोन लोकसभा मतदारसंघांऐवजी तीन लोकसभा मतदारसंघ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तासंघर्षाची स्पर्धा सुरू होणार, हे नक्की आहे.
मतदारसंघात संपर्क ठेवण्यासाठी अनेकांनी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. साम, दाम, दंड, भेद या माध्यमातून मतदारसंघ आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर अनेकांनी राजकीय उदयाच्या दृष्टीने मतदारांशी संपर्क ठेवण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत गेल्या 20 वर्षांपासून पेरलेली राजकीय बीजे सरकारच्या या निर्णयामुळे उखडली जाण्याची शक्यता आहे.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा या दोन तालुक्यांचा समावेश आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे सदस्य श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे सदस्य धैर्यशील माने आहेत.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील माने आणि भाजपचे नेते, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यात सध्या लोकसभेवरून राजकीय भाष्य सुरू आहे. मात्र, इचलकरंजी आणि हातकणंगलेचा विचार केल्यास दोघांसाठी कोणता पूरक मतदारसंघ निर्माण होईल का? की दोघांची थेट लढत होईल, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
विधानसभा मतदारसंघांचा विचार केल्यास गडहिंग्लज आणि कोल्हापूर शहरातील वाढलेली लोकसंख्या विचारात घेता, कोल्हापूर शहरातील सध्या दोन विधानसभा मतदारसंघांऐवजी तीन मतदारसंघ होण्याची शक्यता आहे. चंदगड आणि कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये समाविष्ट झालेला गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघ पुन्हा नव्याने निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आतापासूनच गडहिंग्लजवर वर्चस्व ठेवण्यासाठी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात राजकीय स्पर्धा सुरू आहे. तर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी आतापासूनच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपासून करवीर, कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये आपले राजकीय प्रस्थ घट्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
यापूर्वी सतेज पाटील यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून कार्यकर्त्यांची बांधणी केली आहे. त्याच पद्धतीने कोल्हापूर शहरातील दोनऐवजी तीन मतदारसंघांची रचना झाल्यास त्याचा फायदा सतेज पाटील यांना होऊ शकतो. जर तिसऱ्या वाढीव मतदारसंघामध्ये करवीरचा काही भाग जोडल्यास सतेज पाटील यांची थेट लढत कोल्हापूर उत्तरचे शिवसेनेचे नेते आमदार राजेश क्षीरसागर किंवा करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी होऊ शकते. सध्या महायुतीच्या गोटातून जिल्ह्यात कोणतीही हालचाल दिसत नसली, तरी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडून संभाव्य मतदारसंघ लक्षात घेऊन रणनीती आखली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.