

Mumbai News : मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकावरून विरोधकांच्या इंडिया आघाडीत मतभिन्नता समोर येऊ लागली आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी मोदी सरकारकडून खासदारांची जुळवाजुळव सुरू असतानाच महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि तमिळनाडूतील डीएमकेने विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
केंद्र सरकारने मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित विधेयके पुन्हा संसदेत मांडण्याची तयारी केली आहे. घटनादुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन-तृतीयांश बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या भूमिकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
केंद्र सरकारच्या डिलिमिटेशन विधेयकाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विरोध आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात शिवसेनेचे खासदार या विधेयकाच्या विरोधात मतदान करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची विधेयकावरील अंतिम भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसताना आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष संसदेत एकसमान भूमिका घेणार की वेगवेगळी, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
शनिवारी (२८ नोव्हेंबर) दुपारी नवी दिल्लीत इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार गैरहजर राहिले. या बैठकीत केंद्र सरकारच्या डिलिमिटेशन विधेयकावर चर्चा करण्यात आली.
केंद्र सरकारकडून मनमानी पद्धतीने मतदारसंघ पुनर्रचना केली जात असून, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वावर अन्याय केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. लोकसभेतील जागा वाढल्यानंतर संविधानात बदल केले जाऊ शकतात, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
एकीकडे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विधेयकाला विरोध केला असताना इंडिया आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि तमिळनाडूतील डीएमकेने मात्र वेगळी भूमिका घेतली आहे.
शनिवारी चेन्नई येथे डीएमकेचे अध्यक्ष आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत डीएमकेच्या खासदारांनी केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित विधेयकांना पाठिंबा दर्शवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.