Raju Shetti, Murlidhar Jadhav, Uddhav Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Thackeray Group : 'राजू शेट्टी म्हणजे आयत्या बिळात नागोबा, ठाकरेंनी मला संधी द्यावी, अन्यथा...' : आघाडीत पहिली ठिणगी

Rahul Gadkar

Kolhapur News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्या आघाडीत जाणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. यातच माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, या भेटीनंतर हातकणंगलेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी विरोध करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

महाविकास आघाडीतच विरोध झाल्याने शेट्टी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे राजू शेट्टी यांनी आघाडीची गरज नसल्याचे सांगत असले तरी त्यांच्या गुप्त भेटी सुरू आहेत. एकीकडे महाविकास आघाडीवर टीका करायची आणि दुसरीकडे गोंजारायची, अशीच भूमिका शेट्टी यांची असल्याचे दिसते. त्यावरूनच आता शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी विरोध करताच राजकीय खळबळ उडाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे वारंवार भूमिका बदलत आहेत. शेट्टी यांचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत. आयत्या बिळात नागोबा असल्यासारखे शेट्टी आहेत. माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला ठाकरे यांनी संधी द्यावी,' असं जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले.

'राजू शेट्टी हे बिनभरवशाचे आहेत. महाविकास आघाडीला ते मदत करणार नाहीत. निवडून आल्यानंतर शेट्टी हा माणूस ग्रामपंचायत, विधानसभेला मदत करणार नाही. एक रुपयाचा फंडही देऊ शकणार नाही. राजू शेट्टी जर ठाकरे यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करीत असतील, तर राजू शेट्टींची जागा कुठे आहे, हे ठाकरेंना नक्कीच माहिती आहे,' अशी प्रतिक्रिया मुरलीधर जाधव यांनी दिली.

'गेल्या अनेक वर्षांपासून मी शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. उद्धव ठाकरे यांनी मला उमेदवारी देऊन शिवसैनिकांना बळ द्यावं, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर माझा विश्वास आहे, मला न्याय देतील, अशी आशा आहे. जर माझ्या उमेदवारीबाबत निर्णय घेतला नाही, तर आठ दिवसांत माझी भूमिका जाहीर करेन,' असा इशाराही मुरलीधर जाधव यांनी दिला.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT