A. Y. Patil, Hasan Mushrif
A. Y. Patil, Hasan Mushrif sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'मुश्रीफांनी हात टेकले...' राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चार दिवसात मोठा निर्णय घेणार

सरकारनामा ब्यूरो

सोळांकूर : २७ वर्षांच्या राजकारणात कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर आणि विश्वासावर मी घडलो आहे. माझ राजकारण त्यागाच आहे. नेतृत्वाने वार्‍यावर सोडले असले तरी कार्यकर्त्यांच्या हृदयात माझे स्थान अढळ आहे. म्हणून कोणताही निर्णय घाईगडबडीत न घेता आपल्यावर प्रेम करणाऱ्या शेवटच्या कार्यकर्त्यालाही विश्वासात घेऊन येत्या चार दिवसांत योग्य तो राजकीय निर्णय घेईन, अशी घोषणा राष्ट्रवादीचे (NCP) जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केली.

सोळांकूर, (ता. राधानगरी) येथे पाटील राष्ट्रवादीत अस्वस्थ असल्याच्या आणि ते मुख्यमंत्री शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील विविध गावांतील पाटील समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.

आजच्या मेळाव्यात ते काय निर्णय घेणार याची संपूर्ण जिल्हाभर चर्चा होती. मात्र, पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्याची घोषणा केल्याने त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसंदर्भात कार्यकर्त्यांत उत्सुकता निर्माण झाली आहे. मेळाव्यात निर्णयाचे सर्वाधिकार पाटील यांना देण्यात आले.

या वेळी पाटील म्हणाले, २७ वर्षांच्या राजकारणात सातत्याने कार्यकर्त्याला मोठे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या ताकदीवर मी मोठा झाला असून त्यांना कधीही अंतर देणार नाही. मी आमदार व्हावे ही तमाम कार्यकर्त्यांची इच्छा असून त्यासाठी आता योग्य निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचा सूचक इशारा त्यांनी दिला.

तसेच राष्ट्रवादी पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हाभर कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी केली. पक्षाच्या वाढीसाठी अतोनात प्रयत्न करुनही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कडगाव येथील कार्यक्रमात विधानसभेच्या उमेदवारीची परस्परच घोषणा केल्याने आपल्याला दुःख झाले, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.

आमच्या मेव्हण्या-पाहूण्यांच्या वादासमोर जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनीच हात ठेकल्याचे वक्तव्य केल्याने मी निराश झालो. आता योग्य निर्णय घेण्याचा आपल्यावर कार्यकर्त्यांचा दबाब आहे. त्यांच्या विश्वासाला तडा न जावू देता योग्य तो निर्णय घेईन. माझ्या राजकीय जीवनात मुश्रीफ यांनी मला आधार दिला. तेच माझे माय-बाप आहेत. आमच्या मेव्हण्या-पाहूण्यांच्यात समेट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, या वादासमोर त्यांनीही हात टेकल्याने मग मी कोणाकडे बघु, असे पाटील म्हणाले.

या वेळी रणजीत पाटील, भिमराव कांबळे, अशोक साळुंखे (नागणवाडी ), दिपक पाटील, दिगंबर चव्हाण, बाबुराव साबळे, मारुती बारड, बाळू कामते, विलास हळदे, संग्राम कदम, भोगावतीचे माजी संचालक शिवाजीराव पाटील, बाजार समितीचे माजी संचालक नेताजी पाटील, आबु ताकिलदार यांची भाषणे झाली.

फिरोजखान पाटील, एकनाथ पाटील, महादेव कोथळकर, नाना पाटील, सचिन पाटील, बबन जाधव, मोहन पाटील, दिलीप कांबळे, स्वप्निल पाटील, नंदकुमार पाटील, शाकीर पाटील, राजू कवडे, के. डी. चौगले, वाय. डी. पाटील, संजीवनी कदम, सर्जेराव पाटील उपस्थित होते. गोकूळचे संचालक प्रा. किसन चौगले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संभाजी देसाई यांनी सूत्रसंचालन केले. बिद्रीचे संचालक युवराज वारके यांनी आभार मानले.

प्रत्येक वेळी मला निवडणूक लढवण्यासंदर्भात शब्द दिला

१९९५ पासून मी त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत सारथ्याची भूमिका पार पाडली. प्रत्येकवेळी मला ते यावेळी मी निवडणूक लढवतो; पुढील वेळी तुम्हाला संधी देतो, असा शब्द द्यायचे. मात्र, प्रत्येकवेळी माझी फसवणूक झाली. अंगावरील हळद निघण्यापूर्वीच मला पद्धतशीर बाजूला केले गेले. रामभक्त हनुमानाप्रमाणे साथ सोबत करुनही आपल्यावर दरवेळी अन्यायच झाल्याचा उच्चार त्यांनी यावेळी माजी आमदार के. पी. पाटील यांचे नाव न घेता केला.

हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी...

आपल्यावर अन्याय झाला हे सत्य असून याबाबत सर्व वस्तुस्थिती मी तुमच्यासमोर मांडली आहे. यानंतर समोरुन प्रत्युत्तर आल्यास त्यालाही उत्तर देण्यास मी समर्थ असून आज मी आपल्यासमोर मांडले, तो फक्त ट्रेलर आहे. यापुढे घोटाळा करणाऱ्यांचाच घोटाळा होणार आहे. मी याबाबत योग्य वेळी तोंड उघडणार असून तो संपूर्ण पिक्चर असेल, अशा इशारा पाटील यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT