Gokul Election 2026 : सहा महिन्यात 12 हजार वेळा सांगणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीतील भाजपला वगळून घटक पक्षाची आकडेवारी सांगून थेट भाजपसह महाडिक गटालाही इशारा दिला आहे. मुश्रीफ यांच्या यां वक्तव्यामुळे त्यांची गरज नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट आणि जनसुराज्यकडे मिळून 3500 ठराव असून राहिलेले ठराव हे काँग्रेस व इतरांकडे असल्याचे सांगितले. मात्र यामध्ये भाजपचा उल्लेख केला नसल्याने एकप्रकारे भाजप आणि पर्यायाने महाडिक गटालाच इशारा दिला आहे.
गोकुळ'च्या निवडणुकीसाठी प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील बहुतांशी संस्थांच्या पात्रतेवर आक्षेप घेण्यात आले. त्यातून सुमारे 1400 संस्था या ना त्या कारणाने अपात्र ठरल्या. विशेष म्हणजे या सर्व संस्था पाच वर्षांत आणि 'गोकुळ'मध्ये सत्तांतर झाल्यानंतर सभासद झाल्या होत्या. या संस्थांना अपात्र ठरवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बदल्यांपासून ते अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई झाली. त्यात या संस्थांना न्यायालयाने न्याय मिळवून दिला आणि त्या सर्व संस्था पात्र ठरल्या; पण त्यातून महायुतीतच या संस्था अपात्र ठरवण्यासाठी राबणारी अदृश्य शक्ती विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) असा संघर्ष सुरू झाला.
गेल्या आठवड्यात पात्र ठरलेल्या या 1400 संस्थांच्या मेळाव्यात त्रास देणाऱ्या शक्तीविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. या मेळाव्यामागे कोण होते हेही सर्वश्रुत आहे. या अदृश्य शक्तीचे थेट नाव कोण घेत नसले तरी या मागे कोण होते, हे आता लपून राहिलेले नाही; पण यातून गेली अनेक वर्षे महायुती (Mahayuti) म्हणूनच 'गोकुळ'च्या निवडणुकीला सामोरे जाणार असे सांगणारे मंत्री मुश्रीफ मात्र आक्रमक झाले आहेत. काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी या संस्थांच्या न्यायालयीन लाढाईवरून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना डिवचले असले तरी त्यानंतर त्यांनी सांगितलेली आकडेवारी पाहता हा भाजप आणि पर्यायाने महाडिक गटालाच इशारा समजला जातो.
महायुतीत भाजपसह राष्ट्रवादी अजित पवार पक्ष, शिवसेना शिंदे पक्ष व जनसुराज्य पक्ष आहे; पण आकडेवारी सांगताना भाजप वगळून आपल्याकडे 3500 ठराव असल्याचे सांगून मुश्रीफ यांनी 'सोबत आला तर या, नाही तर तुमची गरज नाही' असाच अप्रत्यक्ष संदेश दिला आहे. आता यावर भाजपची रणनीती काय असणार, त्यावर 'गोकुळ'ची समीकरणे अवलंबून आहेत.
विजयासाठी 2700 ठराव गरजेचे 'गोकुळ'च्या एकूण 5 हजार 454 संस्था मतदानासाठी पात्र ठरल्या आहेत. विजयासाठी किमान 2700 ठरावांची गरज आहे. मंत्री मुश्रीफ यांनी भाजप वगळून आपल्याकडे 3500 ठराव असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसचे आमदार पाटील व भाजपकडे ठराव किती, याची चर्चा आता सुरू झाली आहे. ठरावांच्या संख्येवरून जागा वाटपाचे सूत्र निश्चित होणार आहे. जागा वाटपातच वाद झाला, तर मात्र निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.