

Gokul Milk Union election 2026 : गोकुळ दूध संघाची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा महायुतीतील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र होत चालला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर अवसायानातील संस्था मतदानाला पात्र कराव्यात, अशा सूचना दिल्यानंतरही ऐनवेळी अधिकारी बदलला. त्यामुळे पुन्हा एकदा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि महाडिक गटातील वाद हा विकोपाला पोहोचला आहे.
संस्था पात्र आणि अपात्रेवरून दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर दिवसेंदिवस हा संघर्ष टोकाचा बनत चालला आहे. शिवाय महायुतीमधील इतर पक्षांचीही नाराजी महाडिक गटावर वाढली आहे. त्यामुळे भाजपला वगळून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य शक्ती असे पॅनल करण्याची मागणी घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेलेल्या एका नेत्याला मुख्यमंत्र्यांनी महायुती म्हणूनच लढण्याचा सल्ला दिल्याने आशेवर पाणी फिरले आहे.
भाजपला कोणत्याही परिस्थितीत गोकुळच्या निवडणुकीतून बेदखल करता येणार नाही. याची जाणीव झाल्याने महायुती मधील घटक पक्षांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून गोकुळ दूध संघामध्ये संस्था पात्र अपात्रतेवरून सुरू असलेल्या सुप्त संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे.
महायुती मधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपली असताना हा वाद आता व्यक्तिगत पातळीवर गेला आहे. प्रारूप मतदार यादीच्या हरकत सुनावणी वेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांचा गट आमने सामने आल्याने हा संघर्ष उफाळून आला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अदृश्य शक्ती कोण आहे? याबाबत खुलेआम कोणीही बोलत नसले तरी या प्रकारामुळे हे सर्वांसमोर आले आहे.
वाढीव दूध संस्थांना अपात्र करण्यासाठी महादेव दूध संस्थेचे प्रकाश बेलवाडे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अदृश्य शक्तीकडून प्रयत्न सुरू आहेत. या वाढीव दूध संस्थेमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य शक्तीच्या गटातील संस्थेचा समावेश आहे. सातत्याने होणाऱ्या कुरघोडीच्या राजकारणामुळे अनेक नेते भाजपवर खास करून महाडिक गटावर नाराज आहेत. शिवाय अनेकांची मानसिकता ही महाडिक गटाला पाठिंबा देण्याची नसल्यामुळे नेहमीच नेतृत्वाची भूमिका घेणाऱ्या एका नेत्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
गोकुळ दूध संघामधील सुरू असलेल्या राजकारणाची माहिती देत भाजपला वगळता गोकुळ दूध संघाची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती असे एकत्र येऊन युतीच्या माध्यमातून लढण्याची विनंती केली. मात्र ही मागणी मुख्यमंत्र्यांनी धुडकावून लावत महायुती म्हणूनच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची सूचना केली.
दरम्यान, शेवटच्या वर्षात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ हे गोकुळचे अध्यक्ष असल्याने मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळच्या राजकारणात अधिक रस दाखवला आहे. अशा परिस्थितीत वाढीव 1320 दूध संस्थांना अपात्र करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र न्यायालयीन लढाई लढत त्यातील 644 दूध संस्था अवसायानात करण्यात आल्या. तर 427 दुध संस्थांची चौकशी लावण्यात आली. यातूनच उर्वरित 410 संस्था सभासदांनाच वगळण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे न्यायालयीन लढाई सुरू झाली.
न्यायालयीन लढाईतून संस्थांना अभय मिळण्याचे संकेत मिळाले असताना प्रारूप मतदार यादीत या संस्थांचा समावेश करण्यात यावा, अशी सूचना मांडली. मात्र न्यायालयाने आदेश देताना कायद्याच्या चौकटीत राहून आणि सत्यता पडताळूनच या संस्थांना अधिकार देण्यात यावेत, अशी सूचना केल्यानंतर पुन्हा एकदा ऐनवेळी अधिकारी बदलण्यात आला. त्यामुळे नियमावर बोट ठेवत अनेक संस्था यातून अपात्र होण्याची भीती व्यक्त केली. त्यामुळे पुन्हा एकदा महाडिक आणि मुश्रीफ गटाचा वाद टोकाचा बनला आहे.
येत्या 4 सप्टेंबर रोजी प्रारूप मतदार यादीवरील हरकतीचा निकाल दिला जाणार आहे. त्यानंतर अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीवरच महायुतीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे गोकुळ दूध संघाच्या हालचाली गतिमान झाल्या असून सर्वच नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.