Kolhapur Villages Protest Against Delimitation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : कोल्हापुरातील १८ गावांनी लावले कुलूप; हद्दवाढीविरोधात पुकारला एल्गार

Sachin Fulpagare

Kolhapur News : कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी संकेत दिलेत. आता कोल्हापुरातील १८ गावं या हद्दवाढीच्या विरोधात पेटून उठली आहेत. हद्दवाढविरोधात प्रस्तावित १८ गावांतील ग्रामस्थांनी आज कडकडीत बंद पाळून याचा निषेध केला. डोक्याला काळ्या फिती लावत कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाचा निषेध नोंदवला, तर या १८ गावांतील सर्व व्यवसाय, दुकाने बंद ठेवून हद्दवाढ विरोधात उभ्या राहिलेल्या चळवळीला पाठिंबा दिला.

या गावांचा प्रस्तावित हद्दवाढमध्ये समावेश

उचगाव, पाचगाव, नवे बालिंगे, नागदेवाडी, शिंगणापूर, उजळाईवाडी, शिरोली, नागाव, वळीवडे, गोकुळ शिरगाव, सरनोबतवाडी, वडणगे, शिये, आंबेवाडी, वाडीपीर, नागदेवाडी यांच्यासह दोन औद्योगिक वसाहतीमध्ये हद्दवाड विरोधात बॅनरबाजी करत विरोध दर्शवला. कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होऊ देणार नाही. आधी शहराचा विकास करा, मग हद्दवाढीचा विचार करा, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

...अन् १८ गावं पेटून उठली

गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचे घोंगडे भिजत आहे. युतीमधील राज्यातले दोन नंबरचे मंत्रिपद कोल्हापुरात असतानाही शहर हद्दवाढीचा निर्णय घेता आला नव्हता. महाआघाडी सरकारच्या काळात केवळ जनमत विचारात घेता याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले होते. पण महायुतीच्या काळात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हद्दवाढीचे संकेत दिलेत. अनेक वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार असला तरी मुश्रीफ यांच्या विधानाने प्रस्तावित १८ गावांत हद्दवाढीवरून संघर्ष उफाळून आला आहे.

हद्दवाढीवर काय म्हणाले मुश्रीफ?

पालकमंत्री झाल्यापासून कोल्हापूर महापालिकेत हसन मुश्रीफ यांनी पहिली आढावा बैठक घेतली. या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी येत्या वर्षभरात हद्दवाढ करण्याचे संकेत दिले. हद्दवाढ करत असताना प्रस्तावित १८ गावांपेक्षा शहरात मिसळलेल्या गावांना शहराच्या हद्दवाढीत घेण्याचा प्रयत्न आहे. काही मोजकीच गावे शहरात मिसळलेली आहेत. त्यामुळे आमच्या परीने हद्दवाढ करण्याचा प्रयत्न राहील, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT