Kolhapur, 03 June : विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थानिक राजकारणात काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे नाव अग्रभागी असते. गोकुळ दूध संघ असो वा कोल्हापूर जिल्हा बँक किंवा साखर कारखान्याची निवडणूक जिल्ह्यातील कार्यकर्ते सतेज नेतृत्वावरच प्रत्येक निवडणुकीला सामोरे जातात.
काँग्रेसचे नेते सतेज पाटील मागील तीनही लोकसभा निवडणुकीला केंद्रस्थानी राहिले आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात या गटाची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. कोणाच्यातरी विजयासाठी किंवा कोणाचा पराजय करण्यासाठी पाटील गटाची भूमिका जिल्ह्यात नेहमीच चर्चेचा विषय ठरते.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही सतेज पाटील (Satej Patil) गटाची ताकद निकालावरून आणखी गडद होण्याची शक्यता आहे. श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची उमेदवारी केंद्रीय पातळीवरून खेचून आणण्यात सतेज पाटलांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात वाढलेली काँग्रेसची (Congress) ताकद, राज्यातील महत्त्वाच्या विषयात सतेज पाटील यांनी घातलेले लक्ष यामुळे केंद्रीय नेतृत्वाला सतेज नेतृत्वाची भूरळ पडली आहे. ‘एक्झिट पोल’ नुसार कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेची जागा महाविकास आघाडीला मिळाल्यास सतेज नेतृत्वावर केंद्रीय पातळीवरही शिक्कामोर्तब होण्यास मदत होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस नेते सतेज पाटील आणि सध्याचे भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचं गेल्या काही वर्षांपासून राजकीय वैर संपूर्ण राज्याला माहिती आहे. एकमेकांच्या जीवावर उठलेले राजकारण संपूर्ण जिल्ह्याने पाहिलं आहे.
अशातच 2014 च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिकांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाली. त्यावेळी आघाडी धर्म म्हणून काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी मदत करावी, यासाठी हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी केली.
राजकीय वैर संपवून सतेज पाटील यांनी आघाडी धर्म म्हणून धनंजय महाडिक यांना लोकसभेसाठी मदत केली. त्यावेळी सतेज पाटील गटाची भूमिका महत्त्वाची ठरली. देशात मोदी लाट असतानाही कोल्हापुरात मात्र धनंजय महाडिक राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजयी झाले होते. मात्र, विजयानंतर पुन्हा धनंजय महाडिक आणि सतेज पाटील विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात थांबले.
विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत आपले बंधू अमल महाडिक यांनाच धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्या विरोधात उभे केले. त्यात सतेज पाटील यांचा पराभव झाला. मात्र, सतेज पाटील यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आघाडी धर्मालाच फाट्यावर मारत भाजप शिवसेना युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार केला.
राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले धनंजय महाडिक यांचा त्यावेळी पराभव झाला. या लोकसभा निवडणुकीतही सतेज पाटील यांच्या भूमिकेवर जनतेनेही दिशा बदलली. सतेज पाटील यांच्या भूमिकेला जनतेने साथ देत राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिक यांचा पराभव केला. या निवडणुकीत ही सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वाची राहिली.
लोकसभेच्या 2024 च्या निवडणुकीतही काँग्रेस नेते सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला जात असताना, सतेज पाटील यांनी ही जागा काँग्रेसकडे घेतली. काँग्रेसकडे प्रबळ उमेदवार नसताना शाहू महाराज छत्रपती यांच्या रूपाने मोठा डाव या निवडणुकीत टाकला.
प्रचाराची सर्वच यंत्रणा आपल्या हातात घेऊन सतेज पाटील स्टार प्रचारकाच्या भूमिकेत राहिले. यंदाच्या निवडणुकीतही सतेज नेतृत्व जनतेने मान्य केले आहे. केवळ उद्याच्या निकालाची त्याला औपचारिकता बाकी आहे. हेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे यंदा त्यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे.
Edited By : Vijay dudhale
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.