Chhatrapati Sambhajinagar News : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही तास शिल्लक असतांना इतके दिवस विजयाचे दावे करणाऱ्या उमेदवारांच्या उरात धडकी भरायला लागली आहे. लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील महायुतीचे संदीपान भुमरे, महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील या प्रमुख उमदेवारांनी आपापल्या पद्धतीने देवाचा धावा केला.
खैरे यांनी आठ तास हनुमान मंदिरात यज्ञ केला, इम्तियाज यांच्या समर्थकांनी दर्ग्यावर चादर चढवत दुआ मागितली. तर संत एकनाथ महाराजाच्या पैठणमधून पाचवेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या आणि आता लोकसभेसाठी नशिब आजमावत असलेल्या भूमरेंनी संत एकनाथांचा आशिर्वाद आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे.
एकनाथ महाराजांच्या आशिर्वादाने आपण दीड लाख मतांनी निवडून येणार, असं भुमरे सांगू लागले आहेत. विशेष म्हणजे एक्झीट पोलच्या अंदाजातून खैरे संभाजीनगरमधून आघाडीवर असल्याचे दिसून आले तेव्हा भुमरे यांनी एक लाख मतांनी निवडून येण्याचा दावा केला होता. आता त्यात पन्नास हजारांची वाढ केल्याने त्यांचा आत्मविश्वास भलताच वाढल्याचे दिसून आले.
पैठण या संत एकनाथ महाराजांच्या भूमीतून सहावेळा विधानसभेची निवडणूक लढलेले आणि पाच वेळा शिवसेनेकडून निवडून आलेले संदीपान भुमरे यांची प्रतिष्ठा या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली आहे. संभाजीनगगरची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपशी भांडून सोडवून घेतली होती.राज्यात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण लागू केल्याचा लाभ उठवण्यासाठी खास मंत्रिमंडळातील सहकारी असलेल्या भुमरेंना लोकसभेच्या मैदानात उतरवले. सहसा राज्यात मंत्री असलेली व्यक्ती लोकसभा लढवण्यास फारशी इच्छूक नसते. परंतू आपल्या मुलासाठी पैठण विधानसभा मतदारसंघ सुरक्षित करण्याच्या हेतून भुमरे यांनी लोकसभेची उमेदवारी स्वीकारल्याचे बोलले जाते.
निवडणुकीत विरोधकांनी भुमरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला असला तरी महायुतीतील घटक पक्षांच्या मदतीने भुमरे यांनी महाविकास आघाडीसमोर तगडे आव्हान उभे केल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीत भुमरेंचा विजय झाला तर त्यांचे शिवसेनेत निश्चितच वजन वाढणार आहे. त्यांचा राजकीय अनुभव पाहता केंद्रातील नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते, अशी आशा त्यांचे समर्थक आतापासूनच बाळगून आहे.
या जरतरच्या प्रश्नाचे उत्तर पुढील चोवीस तासात मिळणार आहे. संदीपान भुमरे यांच्या विजयावरच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पैठण मतदारसंघाचे व भुमरे यांच्या पुत्राचेही भवितव्य अवलंबून असणार आहे. तेव्हा भुमरे यांना संत एकनाथ महाराजांचा अशिर्वाद मिळतो का? याची सगळ्यांना उत्सूकता लागली आहे.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.