Kolhapur News : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाचे कथित खासगीकरण करण्याच्या मुद्द्यावर रंगकर्मी आणि महापालिकेतील सत्ताधारी यांच्यात संघर्ष सुरू आहे. अशात आता भाजपमध्येच दोन वेगवेगळे सूर उमटल्याचे दिसून आले आहे. राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी "केशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण होणार नाही. हा वाद इथेच थांबवूया," अशी भूमिका घेतल्यानंतर अवघ्या तासाभरात भाजपच्या नगरसेवकांनी प्रसिद्धीपत्रक काढून महासभेच्या निर्णयाचे समर्थन करत महाडिक यांची भूमिका धुडकावून लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगामी कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिकच चर्चेत आला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना महाडिक म्हणाले, "रंगकर्मींचे मलाही फोन आले होते. त्यांचे आंदोलनही पाहिले. केशवराव भोसले नाट्यगृहाचे खासगीकरण होणार असल्याची चर्चा कुठून सुरू झाली, हेच मला समजत नाही. कोणत्याही परिस्थितीत नाट्यगृहाचे खासगीकरण होणार नाही. ते पूर्वीप्रमाणेच महापालिकेकडूनच चालवले जाईल. रंगकर्मी आणि महापालिकेतील काही पदाधिकाऱ्यांकडून विविध वक्तव्ये झाली आहेत. आता या वादावर पडदा टाकूया, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच नाट्यगृहाच्या आगीच्या घटनेचा तपास सुरू असल्याचे सांगत त्यावर भाष्य करणे योग्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
मात्र, महाडिक यांच्या या वक्तव्यानंतर काही वेळातच भाजपच्या नगरसेवकांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून महासभेने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले. "शहरातील ८१ नगरसेवकांनी सखोल चर्चा करून महानगरपालिकेच्या हिताचा विचार करत निर्णय घेतला आहे. काही मोजक्या लोकांचा विरोध म्हणजे संपूर्ण कोल्हापूरचा विरोध नाही. स्वार्थासाठी या निर्णयाला विरोध करणे योग्य नाही," असे त्यांनी म्हटले आहे.
प्रसिद्धीपत्रकात दोन वर्षांपूर्वी संशयास्पद आगीत भस्मसात झालेल्या नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीसाठी महायुती सरकारने तातडीने निधी दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. नव्याने उभारलेले अत्याधुनिक नाट्यगृह लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पित होणार असून, त्या कार्यक्रमात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न काही मंडळी करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
नगरसेवकांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती आणि मनुष्यबळाची कमतरता याचाही दाखला दिला. त्यांच्या मते, नाट्यगृहाचा व्यवस्थापक महापालिकेचाच अधिकारी राहणार असून केवळ काही सेवा बाह्य संस्थांकडून घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे याला खासगीकरण म्हणणे चुकीचे असून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
रंगकर्मींसोबत अनेक फेऱ्यांत चर्चा करून त्यांच्या अनेक सूचनांचाही अंतिम निर्णयात समावेश करण्यात आल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले. तरीही विरोध कायम राहिल्यास तो लोकशाहीतील अधिकार असल्याचे सांगतानाच, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लोकार्पण कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाल्यास "जशास तसे उत्तर दिले जाईल," असा इशाराही त्यांनी दिला.
एकीकडे खासदार धनंजय महाडिक वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे भाजप नगरसेवकांनी महासभेच्या निर्णयावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे केशवराव भोसले नाट्यगृहाचा वाद आता केवळ रंगकर्मी विरुद्ध महापालिका इतकाच मर्यादित राहिलेला नसून, भाजपमधील वेगवेगळ्या भूमिकांमुळेही चर्चेचा विषय ठरला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.