Kolhapur loksabha Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Lok Sabha : एकाच उमेदवारासाठी तीन पक्षांचे दावे, 'सरप्राईज'मध्ये लपलं गूढ

Rahul Gadkar

Kolhapur News : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांमध्ये होण्याची शक्यता असताना इंडिया आघाडी उमेदवारीबाबत संभ्रमात असताना एकाच जागेसाठी तीन पक्षांची जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट या तिन्ही पक्षांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. या तिन्ही पक्षांनीही कोल्हापूर लोकसभेच्या मैदानात श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज यांना उतरण्याची विनंती केली आहे. मात्र त्यांनी यासाठी नकार देत आपली भूमिका जाहीर केली आहे. या संपूर्ण घडामोडीनंतर कोल्हापूरच्या मैदानात स्वतः संभाजीराजे छत्रपती असणार का? हादेखील विषय चर्चेचा झाला आहे.

आठवड्यापूर्वी माजी पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून 'सरप्राईज' चेहरा असेल, असे विधान करून कोल्हापूरच्या (Kolhapur) राजकारणात खळबळ उडवून दिली होती. पाटील यांच्या वक्तव्यानंतर कोल्हापुरातून आघाडीचा उमेदवार कोण, याबाबत अनेक चर्चांना उधाण आले होते. सध्या राज्यात महाविकास आघाडी अंतर्गत जागावाटप आणि उमेदवारीबाबत चर्चा, बैठका सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या जागेवर मात्र तिन्ही पक्षांचे नेते दावा करीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) करून डॉ. चेतन नरके, काँग्रेसचे बाजीराव खाडे आणि राष्ट्रवादीतून व्ही. बी.पाटील, माजी आमदार संजय घाटगे यांची नावे चर्चेत आहेत. आतापर्यंत नरके यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन मातोश्रीवर जाऊन तीन ते चार वेळा पक्षप्रमुखांची भेट घेतली आहे. असे असताना आमदार सतीश पाटील यांच्या वक्तव्याने उमेदवारी अजूनही गुलदस्त्यात आहे.

मागील लोकसभा ही शिवसेनेने जिंकली होती, तर आघाडीत ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने राष्ट्रवादीने (NCP) ही या जागेवर दावा केला आहे, तर इंडिया आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार मतदारसंघात तीन विधानसभा आणि दोन विधान परिषदेचे आमदार काँग्रेसचे असल्याने आणि ताकद चांगली असल्याने ही जागा हाताच्या चिन्हावर लढवण्याची इच्छा नेते व्यक्त करीत आहेत.

त्यातच या तिन्ही पक्षांनी उमेदवारीसाठी श्रीमंत शाहूमहाराज यांच्याच उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते, तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती यांनीदेखील लोकसभा लढवण्याचे संकेत दिल्याने कोल्हापूरच्या राजकारणात एक वेगळीच खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेत अध्यक्षस्थान, शेट्टींच्या आंदोलनात केलेली मध्यस्थी, गेल्या वर्षभरापासून छत्रपती घराण्यातील सुरू असलेल्या भेटीगाठी या संपूर्ण प्रकारामुळे नक्कीच या मतदारसंघात सरप्राईज चेहरा असेल, या चर्चेला उधाण आले आहे.

(Edited By - Chaitanya Machale)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT