Ruparani Nikam, representing the Dhananjay Mahadik faction of the BJP, celebrating her appointment as the Mayor of Kolhapur, amidst discussions regarding the sidelining of veteran party workers. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Mayor : भाजपने निष्ठावंतांना डावललं! कोल्हापूरच्या महापौरपदावर महाडिकांचा वरचष्मा; एका निवडीने साधले दक्षिणचे राजकारण

Kolhapur Municipal: कोल्हापूरच्या महापौरपदी खासदार धनंजय महाडिक गटाच्या रुपाराणी निकम यांची वर्णी लागली आहे. यामुळे विजयसिंह खाडे-पाटील यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्याची चर्चा भाजपच्या वर्तुळात रंगली असून अंतर्गत नाराजी समोर येत आहे.

Rahul Gadkar

Kolhapur Mayor : कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम यांची निवड झाली आहे. आता त्यांच्या निवडीमागे असलेल्या राजकारणाबद्दल चर्चा केली जात आहे. पण कोल्हापूर भाजपमधील अंतर्गत जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचे मतभेद, दक्षिणमधील विधानसभा मतदारसंघाचे राजकारण आणि महाडिक गटाने दाखवलेले वर्चस्व हेच नगरसेवक रूपाराणी निकम यांना महापौरपदासाठी निवडण्याचे कारण ठरले आहे.

काँग्रेससारख्या विरोधी पक्षाला थेट आव्हान देण्यासाठी सभागृहात अनुभवी चेहरा असावा असं म्हणत निकम यांना संधी दिल्याची घोषणा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. पण कोल्हापूर भाजपवर वरचष्मा ठेवण्याचे काम महाडिक गटाने केले आहे. भाजपमधील इच्छुकांच्या गर्दीतून महापौरपदाची उमेदवारी मिळविण्यात बाजी मारली आहे. नवीन सभागृहात काँग्रेसकडून होणाऱ्या विरोधाच्या राजकारणाला तोंड देण्यासाठी, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे राजकारण, उपनगराला महापौरपद असे लक्ष्य या उमेदवारीतून साधले गेले आहे.

सर्वसाधारणमधून विजयी झालेल्या निकम खासदार महाडिक यांच्या कार्यकर्त्या समजल्या जातात. गेल्यावेळी ताराराणी आघाडीतून त्या विजयी झाल्या होत्या. त्यावेळी सभागृहातील कामकाजातील चुणूक, आक्रमक वक्तृत्व शैली यामुळे त्यांच्या पारड्यात महाडिकांचे वजन पडणार, हे निश्चित होते. पण त्याचवेळी सामान्य कार्यकर्त्याला बळ देण्याचे भाजपचे धोरण कुठेतरी धूसर झाल्याचेही जाणवले.

मंत्री चंद्रकांत पाटील यांची पक्षाच्या ध्येयधोरणांच्या अंमलबजावणीबाबत मते स्पष्ट असल्याने भाजपच्या मूळ, सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळण्याची शक्यता दिसत होती. त्यातून माजी नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील यांचे नाव अग्रक्रमावर होते. विशाल शिराळे, विजय देसाई, वैभव कुंभार, प्रमोद देसाई हे जरी इच्छुक असले तरी त्यांची पहिलीच निवडणूक होती. सभागृहात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याकडून महायुतीला जोरदार विरोध केला जाणार हे स्पष्ट आहे.

अशा स्थितीत सभागृहात ठोस निर्णय घेईल, अशा उमेदवाराला संधी मिळावी, असा सूर होता. निकम यांचा गेल्या सभागृहातील कामकाजाचा अनुभव महत्त्वाचा ठरला. तसेच गेल्या सभागृहात त्यांनी भाजप, ताराराणी आघाडीचे संख्याबळ नसताना महापौरपदाची निवडणूक लढविली होती. त्यात पराभव पत्करावा लागला होता. पराभव होणार हे माहीत असूनही त्या रिंगणात उतरल्या, त्याची बक्षिसी म्हणूनही त्यांना ही संधी दिल्याचे बोलले जाते.

त्यांच्याबरोबर विजयसिंह खाडे-पाटील हे तसे निकम यांच्यापेक्षा भाजपचे जुने कार्यकर्ते, मंत्री पाटील यांच्या प्रभागातील नगरसेवक असूनही त्यांचे नाव मागे पडले. त्यासाठी गेल्या काही वर्षांतील पक्षांतर्गत राजकारणाचाही वास असण्याची शक्यता आहे. निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यासाठी वरिष्ठ पातळीवरूनही काही हालचाली झाल्याचे समजते. त्यातूनच सलग १० वर्षांनंतरही पुन्हा महिलेलाच संधी देण्याचे ठरविण्यात आले.

'दक्षिण'चाही विचार :

उमेदवारी देताना दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विचारही झाला आहे. महाडिकांच्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी संग्रामसिंह निकम यांनी या भागातील मोठी जबाबदारी उचलली होती. आतापर्यंत दक्षिण मतदारसंघातील या उपनगरांमध्ये महापौरपदाची संधी मिळाली नसल्याने त्याचाही विचार उमेदवारी देताना झाला असावा. आगामी काळात भाजपला या पदामुळे झालेल्या कामातून बळ मिळू शकते.

2 फॅक्टर ठरले महत्त्वाचे :

निकम यांचे पती संग्रामसिंह हे खासदार महाडिक यांचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासात सतत सोबत असलेल्या निकम यांनी महाडिक गटासाठी भरपूर काम केले. त्यामुळे त्यांच्यासाठी खासदारांनी वजन वापरणे स्वाभाविकच होते. तसेच निकम या ज्या प्रभागातून विजयी झाल्या, त्यासाठी प्रा. जयंत पाटील यांनीही बरेच प्रयत्न केले. त्यामुळे उमेदवारी मिळविण्याच्या प्रक्रियेत या २ फॅक्टरचा मोठा वाटा आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांना भाजपच्या जुन्या, सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी आग्रह धरता आला असता. पण, त्यांनी वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT