Kolhapur Politics Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : 'बलवान'च नवीन प्रभाग रचनेत टिकणार ? नव्या प्रभाग रचनेने इच्छुकांचे मनसुबे उधळणार

Rahul Gadkar

Kolhapur Political News: चार प्रभागातील संपर्क, पक्षाचे पाठबळ तसेच खर्च करण्याची ताकद असणारा ‘बलवान’ उमेदवारच महापालिकेच्या निवडणुकीतील नवीन चार सदस्यीय प्रभाग रचनेत टिकणार आहे. त्यामुळे अनेक पक्षांना अशा उमेदवारांसाठी शोधमोहीम राबवावी लागणार आहे. त्याचवेळी केंद्र, राज्यातील सत्ता, भाजप-ताराराणी आघाडीबरोबर असलेला शिवसेनेचा शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटामुळे या रचनेनुसार होणारी निवडणूक मागील सभागृहात सत्ताधारी असलेल्या काँग्रेस (Congress) व शिवसेनेच्या ठाकरे गटाला सोपी जाणार नाही. (Marathi News)

मोठ्या महापालिकांच्या तुलनेत येथील मतदार संख्या कमी आहे. तसेच एक सदस्यीय प्रभाग असल्याने अनेक प्रभागांत अनेकांची मक्तेदारी झाली होती. ‘हा प्रभाग म्हणजे ते...’ अशी ओळख निर्माण करण्यात आली होती. पक्षीय राजकारणाला सुरुवात झाल्यानंतर त्यात थोडा बदल झाला. पण, काहींनी पक्षांनाही त्या प्रभागातील ताकदीच्या जोरावर तडजोडी करायला लावल्या होत्या. विरोधकांची मते खाण्यासाठी काही जण डमी उमेदवारांचे अस्त्रही वापरत होते. निवडणुकीची ही सारी पारंपरिक पद्धत चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे बदलली जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केवळ एका नव्हे तर आजूबाजूच्या प्रभागांत ज्याचा संपर्क आहे, असाच उमेदवार या निवडणुकीत ताकदवान ठरणार आहे. त्यातच प्रभागाची रचना हाही महत्त्‍वाचा मुद्दा आहे. चार प्रभागांची रचना होताना पारंपरिक मतदानाचा गठ्ठा विस्कळीत होईल असेच दिसते. त्यामुळे या मतदानाला सोबत घेऊन निवडणूक आरामात जिंकायची हे स्वप्न बाळगणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. राज्यातील राजकीय घडामोडींनंतर भाजप, शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी अजित पवारांचा मोठा गट सत्तेत आहे.

भाजपचे खासदार धनंजय महाडिक तसेच मंत्री चंद्रकांत पाटील, ताराराणी आघाडीचे महादेवराव महाडिक, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच शिवसेनेच्या शिंदे गटाचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे शहरातील मोठे नेते एका बाजूला राहणार आहेत. त्यामुळे गेल्या सभागृहात सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजप, ताराराणी आघाडीची निश्‍चितच ताकद वाढणार आहे.

चार प्रभागांत या महायुतीकडून उमेदवार उभे केले जातील. त्यामुळे त्या त्या प्रभागातील ताकद एकवटली जाणार आहे, तर गेल्या सभागृहात सत्ताधारी असलेल्या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याबरोबर शिवसेनेचा ठाकरे गट व राष्ट्रवादीचा शरद पवार (Sharad Pawar) यांचा गट तसेच डावी आघाडी सोबत राहू शकेल, पण आमदार पाटील सोडल्यास इतर गटातून कितपत ताकद मिळणार याबाबत साशंकताच आहे. यामुळे सत्ताधारी महायुतीला तोंड देण्यासाठी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) उमेदवार शोधण्यापासूनच मोठी तयारी करावी लागणार आहे.

गत सभागृहातील संख्याबळ

काँग्रेस : 32

राष्ट्रवादी काँग्रेस : 12

ताराराणी आघाडी : 19

भाजप : 14

शिवसेना : 4

एकूण : 18

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT