Kolhapur News: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. हे गृहीत धरूनच महायुती आणि महाविकास जय्यत हालचाली सुरू केल्या आहेत. महाविकास आणि महायुती हे एकमेकांच्या विरोधात असताना महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत मतभिन्नता दिसून येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घटक पक्षात अजूनही संशयाचे वातावरण आहे.
महाविकास आघाडीत इतर घटक पक्षांवर अविश्वास दाखवला जात आहे. दोन्हीही आघाड्यांकडून एकत्र लढण्याचा सूर आवळला जात असला तरी दोन्ही आघाड्यांमधील एकमेकांच्या घटक पक्षात नेत्यांकडून अविश्वास दाखवला जात आहे. सुरुवातीच्या काळात वरिष्ठ स्तरावरून एकत्र लढण्याचे आव्हान केले जात असले तरी स्थानिक पातळीवर मात्र एकमेकांच्या आरोप प्रत्यारोपामुळे इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. येणाऱ्या काळात एकत्र लढत होईल का? असा प्रश्न इच्छुकांसमोर पडला आहे.
अगदी तोंडावर निवडणूक आल्याने विविध पक्षांनी इच्छुकांचे उमेदवारी मागणी अर्ज घेण्यास सुरुवात केली आहे. आठवडाभरात त्यांच्या मागणीनुसार सर्व्हे केले जातील तसेच मुलाखतीही होतील. निवडणूक जाहीर होत असताना उमेदवार निश्चित करण्याचे उद्दिष्ट पक्षांनी ठेवल्याचे दिसून येत आहे. जिथे गुंतागुंतीचे विषय आहेत, तिथे शेवटच्या टप्प्यात उमेदवार निवडण्याचे ठरवले जात आहे. या साऱ्या प्रक्रियांमुळे निवडणुकीच्या रंगणाऱ्या कुस्तीतील खडाखडी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रत्येक पक्षाने आपापली तयारी चालवली असून, एकत्रित लढण्याच्यादृष्टीने भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांची चर्चा वगळता इतरांनी चर्चा केल्याचे दिसून येत नाही. भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या चर्चेत महायुती म्हणून एकत्रित लढूया. सर्व पक्षांचा मान, सन्मान ठेवू, असे सांगितले गेले. दुसरीकडे पक्ष कार्यालयात भाजपच्या सक्षम कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही, असेही मंत्री पाटील यांनी आश्वासन दिले आहे. महायुती म्हणून एकत्रित लढण्याची चर्चा होत असताना शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या मेळाव्यात महायुतीतीलच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटावर थेट आरोप करण्यात आला.
त्यांचे कॉंग्रेसबाबत संधान असते, असे सांगत त्यांच्याकडून नेहमीच शिवसेनेची फसवणूक होत आली आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निवडणुकीतही तेच दिसून आले. त्यामुळे या निवडणुकीतही तशीच भूमिका असेल तर ते योग्य होणार नाही. त्यांनी आताच महायुती म्हणून निवडणूक लढवण्याची भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान समन्वयक सत्यजीत कदम यांनी दिले. युतीची ही स्थिती असून महाविकास आघाडीतही वेगळे चित्र नाही.
शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनीही थेट कॉंग्रेसलाच दणका दिला आहे. प्रत्येकवेळी शिवसेनेला गृहीत धरण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने करू नये, असे सुनावले आहे. लोकसभा, विधानसभेत कॉंग्रेसला प्रामाणिकपणे मदत केली आहे. पण खासदार, आमदारांकडून अपेक्षित विकास निधी मिळाला नाही. माजी आमदार मालोजीराजेंशी संपर्कच होत नाही. हा द्दष्टिकोन दृिष्टकोन बदलण्याचे आवाहन त्यांनी केले. शहरप्रमुख सुनील मोदी यांनी तर उमेदवारीवरून स्वबळावर लढण्याची तयारी ठेवल्याचे सांगितले.
आतापर्यंत भगवा फडकवण्यासाठी युतीकडून तर सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी आघाडीकडून एकत्र जाण्याच्या घोषणा केल्या जात होत्या; पण उपलब्ध जागा व इच्छुकांची संख्या पाहता प्रत्येकाला जागा वाटपावरून असुरक्षित वाटणे स्वाभाविक आहे. त्यातूनच ही अविश्वासाची ठिणगी पडली आहे. दोन्हीकडील नेत्यांना आग पेटवायची आहे की त्यावर पाणी ओतायचे आहे, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.