Congress leader Satej Patil reacts as Kolhapur municipal and nagarpanchayat election results alter local political equations in favor of the Mahayuti alliance. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil : सतेज पाटलांची 'आमदारकीची' वाट बिकट : नगरपालिका निकालाने बदलली समीकरण : आता कोल्हापूर अन् इचलकरंजी महापालिकेकडून आशा

Kolhapur Municipal Results : नगरपालिका निकालांमुळे कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व वाढले असून काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्यासाठी आगामी विधान परिषद आणि महापालिका निवडणुकीचे आव्हान खडतर झाले आहे.

Rahul Gadkar

Kolhapur Politics : महायुती सरकार सत्तेत आल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसची वाट खडतर बनत चालली आहे. जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या देखील दिवसेंदिवस अडचणीत वाढ होत आहे. एकेकाळी काँग्रेसचा जिल्ह्यावर दबदबा निर्माण झाला असताना विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशामुळे खचून गेलेल्या काँग्रेसला पुन्हा एकदा नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत झटका मिळाला आहे.

सहाजिकच 2 वर्षांनी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या 10 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विधान परिषदेत असणाऱ्या काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर वाट खडतर झाली आहे. पुढील टप्प्यात होणाऱ्या कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सतेज पाटील यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका आणि 3 नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल काल लागला. सर्वच राजकीय पक्षांकडून यंदा ही निवडणूक पक्षीय पातळीवर आणि चिन्हांवर लढवल्याने त्याचा थेट परिणाम पुढे होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीवर होणार आहे.

यंदा पहिल्यांदाच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांनी स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढवल्याने जिल्ह्यातील पक्षांच्या ताकदीवर शिक्कामोर्तंब झालेला आहे. बहुतांश नगरपालिकांचा निकाल हा महायुतीच्या बाजूने लागल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे देखील बदललेली आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था गटातील विधान परिषद निवडणुकीचे समीकरणही बदलले आहे. बदललेले समीकरण पाहता या मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची 'वाट' बिकट असणार आहे.

काल लागलेल्या नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निकालामध्ये जिल्ह्यातील 13 पैकी 11 जागांवर महायुतीचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत तर दोन नगराध्यक्ष हे महाविकास आघाडीचे निवडून आले आहेत. या नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या 276 जागा पैकी 89 जागांवर महाविकास तर उर्वरित 187 महायुतीच्या घटक पक्षाचे उमेदवार निवडून आल्याचा दावा केला जात आहे.

आजरा, चंदगड व हातकणंगले, कुरुंदवाड वगळता अन्यत्र काँग्रेसचे उमेदवार कुठेही चिन्हावर रिंगणात नव्हते. या चार नगरपालिकांत मिळून काँग्रेसचे 27 नगरसेवक निवडून आले आहेत. अशा परिस्थितीत निवडून आलेल्यांपैकी आपले किती आणि विरोधकांचे किती याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

शिरोळ, पेठवडगावमध्ये काँग्रेसने आपली सत्ता आल्याचा दावा केला आहे. वडगावमधील यादव आघाडी काँग्रेसला मानणारी आहे, पण शिरोळमधील यादव आघाडीत अन्य पक्षांचाही समावेश होता. जयसिंगपूरमध्येही अशीच स्थिती आहे. हे सर्व पक्ष विधान परिषदेला काँग्रेससोबत राहतीलच असे नाही. त्यामुळे दोन महापालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीत काँग्रेस आणि पर्यायाने महाविकास आघाडीतील घटक पक्ष किती जागा घेणार, यावर आमदार सतेज पाटील यांची भिस्त अवलंबून आहे.

गेल्या दहा वर्षांपासून सतेज पाटील हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून विधान परिषदेत आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर ते विधान परिषदेवर निवडून गेले. तर 2022 मध्ये झालेली विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली. काँग्रेस व भाजपअंतर्गत दोन जागांवर समझोता झाला. त्यात धुळ्याची जागा काँग्रेसने भाजपला सोडली व त्याठिकाणी पूर्वीचे काँग्रेस नेते व आता भाजपमध्ये असलेले अमरिश पटेल बिनविरोध आमदार झाले.

त्याबदल्यात काँग्रेसने कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडली व या निवडणुकीसाठी भाजपकडून अर्ज भरलेले आमदार अमल महाडिक व त्यांच्या पत्नी शौमिका यांनी शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने आमदार पाटील बिनविरोध झाले होते.

महापलिका, जिल्हा परिषदेचे आव्हान

जिल्हा परिषदेच्या 67, कोल्हापूर महापालिकेच्या 81, इचलकरंजी महापालिकेच्या 65 जागांसह पंचायत समितीच्या 12 जागांवर कोण विजय होणार, यावर विधान परिषदेतील आमदार पाटील यांचे भवितव्य अवलंबून आहे. विधान परिषद निवडणुकीला अजून दोन वर्षांचा अवधी आहे, तोपर्यंत राज्यात काय घडामोडी होतात, त्याचा परिणाम या निवडणुकीवर होणार आहे.

मागील परिस्थिती

मागील दहा वर्षांपूर्वीचे राजकारण पाहिले तर कोल्हापूर महानगरपालिकेत सह जिल्हा परिषद आणि नगरपालिका नगरपंचायतीमध्ये बहुतांश ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. मंत्री हसन मुश्रीफ हे देखील काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत असल्याने त्याचा फायदा सतेज पाटील यांना झाला होता.

कोल्हापूर महापालिकेवर काँग्रेसची (Congress) सत्ता होती, त्यांच्यासोबत राष्ट्रवादी व त्यावेळची शिवसेना होती. पण महायुतीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलले आहे. त्यामुळे महापालिकेत सतेज पाटील यांना ताकदीने जास्तीत जास्त जागा निवडून आणाव्या लागतील. इचलकरंजी महापालिकेत तर भाजपचे मोठे आव्हान काँग्रेस आणि पर्यायाने 'महाविकास' समोर असेल.

एकवेळचा अपवाद वगळता जिल्हा परिषदेवर आतापर्यंत कॉंग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे, पण यावेळची परिस्थिती वेगळी आहे. राज्यात भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता आहे. भाजप असो किंवा महायुतीतील अन्य घटक पक्ष एखादी निवडणूक किती गांभीर्याने घेतात, याची प्रचिती आज झालेल्या नगरपालिकांच्या निकालावरून आलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT