Kolhapur News: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसची झालेली पीछेहाट आणि निवडणुकीतून हाताचा पंजा गायब झाल्याने महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांची लढाई सोपी झाली आहे. मात्र महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांच्या लढाईची सर्व भिस्त कारभारी नगरसेवकांवरच असणार आहे. या सर्व प्रकरणात महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते सतेज पाटील यांचीच खरी अग्निपरीक्षा आहे.
लढाई दोन राजेशमध्ये असली तरी कोल्हापूर उत्तरच्या पेपरचा अभ्यास सतेज पाटील यांनाच करावा लागणार आहे. काँग्रेस उमेदवार मधुरिमा राजे छत्रपती यांच्या माघारीनंतर कोल्हापूरच्या उत्तरच्या राजकारणाला कलाटणी मिळाली.
लोकसभा निवडणुकीत एकत्र आलेली महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत मात्र विस्कटलेली पाहायला मिळाली. जर-तरच्या राजकारणात ‘पॅलेस पॉलिटिक्स' आल्यामुळे २००५-०६ मध्ये मालोजीराजे आणि सतेज पाटील यांच्या दुफळी झाली त्याचा प्रत्यय पुन्हा कोल्हापूर उत्तर च्या निवडणुकीत सध्या सुरू झाला आहे.
राजेश लाटकर या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसने महाविकास आघाडीतून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एक हाती नेतृत्व करणाऱ्या सतीश पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या काही कारभाऱ्यांनी उद्रेक केला. त्यातूनच उत्तरच राजकारण ढवळून निघाले.
राजेश लाटकर यांच्या माघारीचे प्रयत्न सुरू असताना काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमा राजे यांनीच माघारी घेतल्याने पुन्हा उत्तरच्या राजकारणाला फोडणी मिळाली. सतेज पाटील यांचा उद्रेक आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांची लोकशाहीची भाषा यावरूनच उमेदवार निवडताना काँग्रेसमध्येच लोकशाही पाळली गेली का? असा सवाल उपस्थित होत आहे. मधुरिमाराजे छत्रपती यांच्या माघारीनंतर राजेश लाटकर यांना महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारी घोषित करण्यात आली.
मात्र राजेश लाटकर यांच्या पुरस्कृत उमेदवारीनंतर ज्या 27 नगरसेवकांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यांची सध्याची भूमिका काय असणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे. ज्यांच्या पिढ्यान्पिढ्या काँग्रेस भवनमध्ये गेल्या त्यांनी तेथे दगडफेक केली. ते लाटकर यांची उमेदवारी स्वीकारणार का? स्वीकारली तर प्रामाणिकपणे विजयासाठी झटणार का? शिवाय तरच राजकारण ज्यामुळे बिघडलं, त्या नगरसेवकांबाबत सतेज पाटील यांची भूमिका काय असणार? असे व विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. सतेज पाटील झाले गेले विसरून कामाला लागले असले तरी, त्यांची रणनीती काय असणार? लाटकर यांना विजयापर्यंत नेण्यासाठी या 27 नगरसेवकांची भूमिका काय असणार? हे देखील पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
काँग्रेसच्या अंतर्गत घोळामुळे महायुतीचे उमेदवार राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची अर्धी लढाई सोपी झाली आहे. मागील निवडणुकीतील पराभवाचा अभ्यास करून बांधकाम व्यवसायिक, डॉक्टर संघटना, खेळाडू, उद्योगपती यांचे संघटन केले आहे.
शिवाय काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनाच शिंदे गटात घेऊन काँग्रेसला धक्का दिला आहे. मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजेश लाटकर हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्यावर ठाम होते. आमदार जाधव यांनी देखील काँग्रेसची साथ सोडल्यानंतर पराभवाच्या छायेत असलेल्या मधुरी महाराज यांनी राजीनामा दिला. विकास कामाच्या जोरावर क्षीरसागर यांची लढाई बऱ्यापैकी सोपी झाली आहे.
पॅलेसमध्ये अंतर्गत राजकारणही आता जगजाहीर आहे. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांचा नगरसेवकांच्या गटाची भूमिका महत्त्वाची आहे. माघारीमुळे ‘पॅलेस पॉलिटिक्स’ला कोणी गृहित धरू नये, हे पुन्हा एकदा राजघराण्याने दाखवून दिले. पण कोल्हापूर उत्तर मधील काँग्रेसच्या घडामोडीचा फटका कोणाला बसणार आणि फायदा कोणाचा होणार हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.