Political rivalry intensifies between BJP leader Dr. Vinay Kore and minister Hasan Mushrif amid Kolhapur district council leadership dispute and upcoming Gokul Milk Union election. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : कोल्हापुरात भाजपसाठी विनय कोरेंचा हसन मुश्रीफांशी पंगा : महाडिक विरोध म्हणून एकत्र आलेल्या नेत्यांमध्ये वादाची ठिणगी

Gokul Milk Union Election : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनय कोरे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील अंतर्गत संघर्ष तीव्र होत असून महायुतीत तणाव वाढला आहे.

Rahul Gadkar

Gokul Dudh Sangh Election : गोकुळ दूध संघाच्या मागील निवडणुकीत मल्टीस्टेटच्या मुद्द्याचे कारण पुढे करत जिल्ह्यातील महायुतीचे नेते काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांना सोबत घेऊन लढले. पण त्यावेळी केवळ गोकुळ दूध संघात महाडिक नको हीच भूमिका सर्वांची होती. आमदार डॉ. विनय कोरे यांनी देखील मंत्री हसन मुश्रीफ व सतेज पाटलांना चांगली साथ दिली.

पण यंदाची निवडणूक महायुती म्हणून लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे आता सतेज पाटील विरोधात असणार आहेत. पण नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीवरून मंत्री मुश्रीफ यांनी जनसुराज्य पक्षाच्या विरोधात घेतलेली भूमिका आणि भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांच्या मनात मुश्रीफ यांच्याबद्दल असलेला राग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने बाहेर आला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात डॉ. कोरे आणि मंत्री मुश्रीफ यांच्या अंतर्गत संघर्षाला अधिक धार आली आहे.

मुश्रीफ-कोरे यांच्यातील अंतर्गत संघर्षाला नगरपालिका निवडणुकीची किनार आहे. विनय कोरे यांनी मुश्रीफ यांच्या गडहिंग्लज या बालेकिल्ल्यात येऊन जनता दलाला ताकद देण्याचा प्रयत्न केला. डाव्या विचारसरणीच्या स्वाती कोरी यांची चर्चा घडवून आणत भाजपसोबत हातमिळवणी केली. तरीही मुश्रीफ यांनी त्याठिकाणी बाजी मारली. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब असुर्लेकर यांनी महायुतीचा धर्म किती पाळला? यावरून कोरे गट राष्ट्रवादीच्या विरोधात नाराज आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मंत्री मुश्रीफ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जवळ करत पन्हाळा आणि शाहूवाडीत कोरे यांच्या पक्षाचा पराभव केला. या दोन्ही तालुक्यांतील पंचायत समितीतील 'जनसुराज्य'ची सत्ताही संपुष्टात आली. पन्हाळा-शाहूवाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आणि माजी आमदार सत्यजित पाटील गटाची काही ताकद मंत्री मुश्रीफ यांच्या मागे राहिली. भविष्यात माजी आमदार राष्ट्रवादीसोबत येतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे विनय कोरे आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अंतर्गत संघर्षाला अधिक धार मिळाली आहे.

दुसरीकडे सुरवातीपासून भाजपमधील नेत्यांचा मंत्री हसन मुश्रीफ यांना रोखण्याचा प्रयत्न सुरु आहे. महापालिका निवडणुकीच्या जागावाटपापासून ते गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीपर्यंत मुश्रीफ यांच्यावर दबाव टाकला जातं आहे. कारण जिल्हा परिषद निवडणुकीतून मंत्री हसन मुश्रीफ यांना काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची अप्रत्यक्ष मदत झाल्याची दिसते. गडहिंग्लज, आजरा व चंदगडमध्ये मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र केले. पण, महायुतीत असूनही त्यांनी भाजप किंवा शिवसेनेला जवळ केले नाही.

काँग्रेसची भूमिका राष्ट्रवादीला पूरक होती. करवीरमध्ये काही ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादीने उमेदवारच दिला नाही. भुदरगड व राधानगरीतील राष्ट्रवादीची भूमिका महाविकास आघाडीला पूरक होती. मुश्रीफ यांच्या या सोयीच्या भूमिकेमुळेच डॉ. कोरे यांच्यासह भाजप व शिवसेना पक्षाचे स्थानिक नेते मुश्रीफांवर नाराज आहेत.'गोकुळ'च्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतील मुश्रीफ यांच्या भूमिकेचा महाडिक गटालाही राग आहे, तो यानिमित्ताने काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्वांबाबत आमदार डॉ. कोरे यांच्यासह भाजप नेत्यांच्या मनात सल आहे.

यातून कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीला पाहिली संधी द्यायची नाही, असा निश्चय भाजपसह शिवसेना आणि कोरे यांनी केला आहे. भाजपकडून कोणीही समोर न येता थेट वरिष्ठ नेत्याकडून मुश्रीफ यांच्यावर दबाव सुरु आहे. तर बुधवारी (ता. 4) मुंबईत झालेल्या महायुतीच्या नेत्यांच्या बैठकीत आमदार डॉ. कोरे यांनी मंत्री मुश्रीफ यांना रोखले.

अध्यक्षपदावर दावा करत महापालिकेच्या सूत्राचा मुद्दा मुश्रीफ यांनी पुढे केला. पण, त्याला पहिल्यांदा विरोध डॉ. कोरे यांनी केल्याचे समजते. त्यांना भाजप आणि खासदार महाडिक यांनी साथ दिली. दिवंगत नेते अजित पवार हे मुश्रीफ यांच्यासाठी मोठे बळ होते. पण, अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे मुश्रीफही हतबल झाल्यासारखे आहेत. मुश्रीफ हे विरोधात जाणे शक्य नाही, याची जाणीव कोरे, महाडिक यांच्यासह भाजप नेतृत्वाला आहे, त्यामुळे त्यांना शह देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हेच राजकारण आता गोकुळमध्ये देखील होण्याची शक्यता आहे. मंत्री मुश्रीफ यांनी ठरवानुसार जागावाटप करण्याचे सूत्र महायुतीच्या नेत्यांपुढे ठेवले आहे. मात्र हे जागावाटप पक्षनिहाय होण्यासाठी दबाव वाढवला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT