Satej Patil, Dhananjay Mahadik, Hasam Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : मुश्रीफांना पाटलांची मैत्री महागात पडणार, विधानसभेला महाडिक गट 10 वर्षाचा हिशेब चुकता करणार?

Kolhapur Politics : मागील पंधरा वर्षाचे राजकारण पाहता सध्याचे महायुतीमधील नेते राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात पालकमंत्री मुश्रीफ यांचे काम राहिल्याचे दिसून येत आहे. पण आता मुश्रीफांना महायुतीमधील नेत्यांचा आधार घ्यावा लागणार आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 21 Sep : आगामी विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापलं असताना महायुतीमधील (Mahayuti) अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येत आहेत. कागल विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना संभाव्य उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या पंधरा वर्षाचे राजकारण पाहता सध्याचे महायुतीमधील नेते राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात पालकमंत्री मुश्रीफ यांचे काम राहिल्याचे दिसून येत आहे. पण आता मुश्रीफ यांना महायुतीमधील नेत्यांचा आधार घ्यावा लागणार आहे.

कोल्हापूर (Kolhapur) महानगरपालिका, गोकुळ दूध संघ, विधानसभा, लोकसभा निवडणूक असो वा सहकारमधील निवडणूक असो. या सर्व बाबतीत मुश्रीफ यांची भूमिका महाडिक गटाच्या विरोधातच राहिली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाडिक गटाचा रोष मुश्रीफ यांच्यावर आहे.

महायुतीतील वरिष्ठ नेते हा रोष कमी करण्याचा प्रयत्न करतील पण राज्यात महायुतीसोबत आणि सहकारात महाविकास आघाडीसोबत अशा दोन्ही दगडावर पाय ठेवून मुश्रीफ यांचे राजकारण सुरू आहे. गेल्या पंधरा वर्षातील राजकारण पाहता मुश्रीफांच्या बाबतीत महाडिक गट काय भूमिका घेणार हे आगामी काळ ठरवणार आहे.

गेल्या दहा वर्षात मुश्रीफांनी महाडिक गटाच्या विरोधात काय काय केले हे जिल्ह्यातील जाणकारांना कल्पना आहेच. शिवाय महाडिक गटाची सत्ता उलथण्यासाठी पालकमंत्र्यांनी आमदार सतेज पाटलांना (Satej Patil) दिलेली साथ आज देखील महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात सलत आहे. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत सध्याच राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून निवडणुकीला सामोरे गेले होते.

त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी मंडलिकांचा विजय झाला. त्यांच्या विजयामागे हसन मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची होती. येथूनच धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि हसन मुश्रीफ यांच्यातील राजकीय कुरघोडीला सुरुवात झाली.

2009 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादीशी घरोबा केला होता. जवळपास त्यांची राष्ट्रवादीतून उमेदवारी निश्चित होती. मात्र, ही उमेदवारी धनंजय महाडिक यांना मिळू नये, यासाठी जिल्ह्यातील पाच आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना पत्र लिहिले होते. या पत्रात धनंजय महाडिक यांना उमेदवारी देऊ नये, अशी विनंती करण्यात आली होती.

त्या पाच आमदारांपैकी हसन मुश्रीफ हे एक नाव होते. त्यामुळे धनंजय महाडिक यांची निश्चित झालेली उमेदवारी युवराज संभाजीराजे छत्रपती यांना देण्यात आली. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे अपक्ष निवडणुकीला सामोरे गेले होते. आणि मंडलिक हेच विजयी झाले होते.

जिल्ह्यातील राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून महादेवराव महाडिकांना पाहिले जात होते. माजी आमदार महादेवराव महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांचे राजकीय वैर अस्तित्वात आल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेवर पंधरा ते वीस वर्षे सत्ता भोगत असलेल्या महाडिक गटाला सूरुंग लावण्याचे काम आमदार सतेज पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार विनय कोरे यांनी यापूर्वी केले आहे.

सध्या महापालिकेवर प्रशासकराज असले तरी गेले दहा वर्ष सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांची सत्ता महानगरपालिकेवर आहे. गेल्या साडेतीन वर्षाचा काळ सोडला तर मागील 25 वर्षे गोकुळ दूध संघावर महाडिक गटाची सत्ता होती. या महाडिक गटाच्या सत्तेला उलटवण्यास आमदार सतेज पाटील यांनी महत्त्वाची भूमिका घेतली.

पण सतेज पाटील एकटेच यामागे नव्हते तर पालकमंत्री मुश्रीफ यांनी देखील पाटील यांना साथ दिली. महाडिक गटाची सत्ता उलथण्यासाठी मुश्रीफ यांनी केलेले प्रयत्न आजही महाडिक गटाच्या जिव्हारी लागले आहेत. गोकुळ दूध संघाला आज ही आर्थिक आणि जिल्ह्यातील राजकीय सत्तास्थान म्हटले जाते. मात्र हेच सत्तास्थान काढून घेतल्यानंतर जिल्ह्यातील महाडिक गटाची ताकद थोड्या प्रमाणात कमीच झाली असे म्हणता येईल.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत देशात मोदी लाट असताना राष्ट्रवादीच्या चिन्हावर धनंजय महाडिक यांनी विजय मिळवला. खासदारकीच्या कार्यकाळात जवळपास आठ कोटीचा निधी कागल विधानसभा मतदारसंघात महाडिक यांनी दिला. मात्र या निधीतून झालेल्या विकास कामाच्या एकाही उद्घाटनाला महाडिक यांना आमंत्रित केलं नाही अशी तक्रार कार्यकर्त्यांनी नुकतीच करून आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्या विरोधात षड्डू ठोकला. यावेळी हसन मुश्रीफ हे देखील महाडिक यांच्या बाजूने प्रचार करत होते. मात्र तरीदेखील कागल विधानसभा मतदारसंघातून संजय मंडलिक यांना 70 हजाराचे मताधिक्य होते. पडद्यामागून मुश्रीफ यांनी महाडिक यांच्या विरोधात काम करून मंडलिक यांना मदत केल्याच्या तक्रारी देखील महाडिक यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या.

याबरोबरच जिल्हा बँक, बाजार समिती यावरील महाडिक गटाची सत्ता उलटवण्यासाठी आमदार सतेज पाटील यांना हसन मुश्रीफ यांची साथ मिळाली आहे. इतकेच नव्हे तर महाडिक गटाकडे असलेला राजाराम कारखान्याची सत्ता उलटवण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटलांची साथ दिली हा राग देखील महाडिक गटाला आहे.

पक्षीय पातळीवर मुश्रीफ हे धनंजय महाडिक यांच्यासोबत आहेत तर सहकार पातळीवर ते महाडिक यांचे राजकीय वैरत्व असलेले आमदार सतेज पाटील यांच्यासोबत आहेत. पाटील आणि मुश्रीफ यांची मैत्री पाहता मुश्रीफ हे नेहमीच पाटील यांच्या बाजूने झुकले आहेत. असा आरोप सातत्याने मुश्रीफ यांच्यावर महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महाडिक गट कोणती भूमिका मुश्रीफ यांच्याबद्दल घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT