Kolhapur Latest News : दिवाळीच्या निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपांची वात पेटवली आहे.
आम्ही आमच्या हक्काचे दाम मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शिवाय साखर कारखानदारांनादेखील स्वस्थ बसू देणार नाही. आज गुरुवारी कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत ऊसदराचा हिशोब मांडणार आहे. त्यावर तोडगा न निघाल्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी त्यांना कोल्हापूर विमानतळावरच घेराव घालण्याबरोबरच येत्या रविवारी (ता.१९) सर्वत्र चक्का जाम आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे दिला.
गतवर्षीचा चारशे रुपयांचा उर्वरित हप्ता द्यावा, तसेच यंदाच्या गळीत हंगामातील उसास प्रतिटन ३५०० रुपये दर देण्यात यावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाअंतर्गत स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले तालुका व शहर शाखेतर्फे बुधवारी रात्री येथील हुतात्मा स्मारक मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
शांततेच्या मार्गाने गेले दीड महिना झाले ऊस आंदोलन सुरू आहे,. पण याविषयी सत्ताधारीच काय? विरोधी पक्षातील नेतेसुद्धा एक शब्दही बोलायला तयार नाहीत. त्यामागे त्या सर्वांचे साखर कारखाने आहेत हे कारण आहे, असे सांगून कारखान्यात केलेली गैरकृत्ये बाहेर पडू नयेत. यासाठी ईडीच्या कारवाईच्या भीतीने इकडे तिकडे उंदरासारखी पळत सुटले असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा अपवाद आहे. कारण त्यांच्याकडे साखर कारखाने नाहीत असे ते म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
ज्या ताकदीने कारखानदार ऊस आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करतील, तितक्याच ताकदीने आंदोलन पुढे रेटले जाईल. शेतकऱ्यांच्या अंगावर बाऊन्सर घालण्याचा प्रयत्न केल्यास उसाच्या कांड्याने त्यांना फोडून काढण्यास मागे पुढे बघणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला. जिल्हाच काय प्रसंगी राज्यात किंवा देशात जिथे जिथे शेतकरी वर्गावर अन्याय होईल तिथे आपण शेतकऱ्यांसाठी लढत राहू.
पोलिस बंदोबस्तात कारखानदार ऊस आणत असून, दबाव तंत्र सुरू असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला होता. हुपरी येथील सभेत, पोलिस प्रशासन कारखानाधार्जिणे वागत असल्याचा आरोप केला. दबावापोटी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करू नयेत. खोट्या केसेसना संघटना भीक घालणार नाही, असे सांगत पोलिसांच्या कार्यपद्धतीचा खरपूस शब्दांंत समाचार घेतला.
आपला 'दत्ता सामंत' करू अशा धमक्या दिल्या जात आहेत, पण अशा पोकळ धमक्यांना मी भीक घालणारा नाही. कामगार नेते दत्ता सामंत, के. एल. मलाबादे या सच्या नेत्यांच्या विचाराचा वारसदार आहे, याचा मला अभिमान आहे, असे सांगून प्रसंगी शहीद होण्याची वेळ आलीच तर त्यास हसत सामोरे जाण्यास तयार असल्याचे शेट्टी म्हणाले.
सभेत राजू शेट्टी यांनी आपण आंदोलन लादले आहे का? इच्छे विरुद्ध आंदोलन करत आहे का? असा प्रश्न विचारताच उपस्थित शेतकऱ्यांनी नाही नाही म्हणत पाठिंबा कायम केला. मागील उसाचे चारशे रुपये घेण्यासाठी आणखी पंधरा दिवस वाट बघायला तयार आहात का? असे विचारताच शेतकऱ्यांनी हात उंचावत आठ दिवसच काय महिनाभर वाट बघायला लागले तरी चालेल पण ऊस दर आंदोलन चालूच ठेवण्याचा ठाम निर्धार या वेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.