Gunratna Sadavarte Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gunratna Sadavarte : मेहुण्याचे लाड दाजींना भोवणार! एसटी बँकेतील सदावर्तेंचे 'खाते' बंद होणार ?

Rahul Gadkar

Kolhapur Political News : एसटी बँकेतील मनमानी कारभारामुळे वैतागलेल्या 14 संचालकांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात जाण्याची भूमिका घेतली आहे. या संचालकांमध्ये अजून एका संचालकाची भर पडल्याने सदावर्तेंच्या विरोधात 15 संचालक उभे राहिले आहेत. हे संचालक मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदावर्ते यांचे एसटी बँकेतील अस्तित्व जाणार की टिकणार, याकडे लक्ष आहे.

एसटी बँकेची सहा महिन्यांपूर्वी निवडणूक पार पडली. याची चर्चा राज्यभरात झाली होती. एसटी बँकेत एसटी कर्मचाऱ्यांच्या अधिकृत संघटनेला मात देऊन सदावर्ते यांनी आपले एकतर्फी पॅनेल विजय केले होते. दरम्यान, 23 नोव्हेंबरला 19 पैकी 14 संचालकांनी सदावर्तेंविरोधात भूमिका घेतली. यात आता सदावर्तेंकडे असलेल्या पाचपैकी एका संचालकाने नाराजांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला.

हे सर्व संचालक सध्या कोल्हापूर जिल्ह्यात अज्ञातस्थळी आहेत. ते मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. सदावर्ते हे दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी विकृत आणि विक्षिप्त भाषण करत आहेत. शिवाय एसटी बँकेतील मनमानी कारभार, 21 वर्षीय मेहुण्याला एसटी बँकेचा व्यवस्थापक संचालक पदावर बसवणे, संचालकांना दमदाटी करणे, शिवीगाळ करणे अशा कारणांमुळे हे संचालक विरोधात गेल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सत्ताधारी व विरोधकांचा पाठिंबा ?

एसटी बँकेवर सदावर्ते यांच्या गटाची सत्ता आल्यानंतर बँकेत मनमानी कारभार सुरू आहे. आशिया खंडातील कर्मचाऱ्यांचा 100 टक्के कव्हरिंग असणारी बँक म्हणून या बँकेकडे पाहिले जाते. ही बँक वाचवण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकातील काही लोकप्रतिनिधींनी अप्रत्यक्षपणे १५ संचालकांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.

पैशांची ऑफर अन् मारण्याच्या धमक्या

सदावर्ते यांच्याविरोधात भूमिका घेणारे 15 संचालक हे अजूनही अज्ञातस्थळी आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सदावर्ते त्यांच्या काही जवळील कार्यकर्त्यांनी केला आहे. संचालकांना पुन्हा येण्यासाठी प्रत्येकी 20 लाखांची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे, तर काही संचालकांना मारण्याचीही धमकी येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. परिणामी एसटी बँकेचे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT