Shivsena UBT Kolhapur Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena UBT : कोल्हापुरातील ठाकरेंच्या शिवसेनेतील वाद मातोश्रीवर मिटणार, जिल्हाध्यक्षपदी नवा चेहरा दिसणार?

Kolhapur Shiv Sena UBT dispute : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निर्माण झालेली अंतर्गत कुरघोडी, जिल्हाध्यक्ष पदावरून सुरू असलेली रस्सीखेच आणि त्यामुळे निर्माण झालेला ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद मातोश्रीवर पोहोचला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 13 Feb : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत निर्माण झालेली अंतर्गत कुरघोडी, जिल्हाध्यक्ष पदावरून सुरू असलेली रस्सीखेच आणि त्यामुळे निर्माण झालेला ठाकरेंच्या शिवसेनेतील (Shivsena) अंतर्गत वाद मातोश्रीवर पोहोचला आहे. त्यामुळे पक्षाची नाहक बदनामी होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हा अंतर्गत वाद मिटवण्यासाठी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या बैठकीत पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी करत जिल्हाध्यक्षपदाचा चेहरा ठरवला जाणार आहे. 14 ते 15 फेब्रुवारी दरम्यान मातोश्रीवर कोल्हापुरातील (Kolhapur) पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून अंतर्गत वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकेकाळी सहा आमदार आणि दोन खासदार असलेल्या या जिल्ह्यात शिवसेनेच्या दुफळीनंतर ठाकरे गटाला घरघर करण्याची वेळ आली आहे. त्यात ठाकरे गटातील अंतर्गत वाद हा पक्ष नासवण्यासाठी जबाबदार ठरत आहे.

हा वाद नव्याने नसून यापूर्वी देखील शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यातील अंतर्गत वाद मातोश्रीपर्यंत पोहोचला होता. मात्र, शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर संजय पवारांनी ठाकरेंच्या तर क्षीरसागर यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा (Shivsena) रस्ता धरला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जागा वाटपावरून अंतर्गत वाद आणखीन चव्हाट्यावर आला आहे.

शिवसेनेचे उपनेते संजय पवार विजय देवणे विरुद्ध शहराध्यक्ष रविकिरण इंगवले असा सातत्याने होणाऱ्या आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी संजय पवार विजय देवणे यांचे आंदोलन सुरू असते त्या ठिकाणी रविकिरण इंगवले उपस्थित नसतात, तर ज्या ठिकाणी रविकिरण इंगवले यांचे आंदोलन असते त्या ठिकाणी संजय पवार किंवा विजय देवणे उपस्थित नसतात.

त्यामुळे केवळ कोल्हापूर जिल्हा नव्हे तर राज्यस्तरावर कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेची बदनामी होत आहे. याची गंभीर दखल आता मातोश्रीने घेतली आहे. जिल्हाप्रमुख बदलण्याच्या हालचाली सुरू असतानाच शहरप्रमुख आणि समन्वयकांनी या पदांबाबत उत्सुकता दाखविली आहे. विधानसभेला दारूण पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाला पुन्हा उभारी देण्याचे काम अपेक्षित होते.

मात्र, अंतर्गत कुरघोडीमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना येत्या 14 व 15 फेब्रुवारीला ‘मातोश्री’वर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. शहरासह उत्तर-दक्षिण आणि करवीरचे जिल्हाप्रमुख बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

शहरप्रमुख रविकिरण इंगवले, करवीरचे तालुकाध्यक्ष राजू यादव, शिवसेनेचे पदाधिकारी विराज पाटील, समन्वयक हर्षल सुर्वे, यांच्यासह अवधूत साळुंखे यांनी जिल्हाप्रमुखपदी मागणी केली आहे. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांची बैठक मातोश्रीवर बोलवली आहे. बैठकीनंतरच कोल्हापूर उत्तर दक्षिणचा जिल्हाध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT